पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल आणि उरण परिसरात कोरोनाग्रस्त वाढत आहेत. त्यामुळे उपलब्ध रुग्णालय रुग्णांवर उपचार करण्याकरता कमी पडत आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मुलुंडच्या धर्तीवर पनवेल परिसरात सिडकोने कोविड रुग्णालय तयार करून द्यावे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे. त्यांनी यासंदर्भात नगरविकास सचिवांकडे पाठपुरावा केला आहे. याबाबत सिडको प्रशासन सकारात्मक असल्याचे पाटील यांनी सांगितले.
पनवेलमध्ये उपजिल्हा रुग्णालय आणि एमजीएम हॉस्पिटल हे कोविड रुग्णालय आहेत. याठिकाणी रुग्णांची संख्या वाढत आहे. करंजाडे, उलवे, तसेच सिडको विकसित करत असलेल्या नैना क्षेत्रातील, सुकापुर विचुंबे, पाली देवद, उसर्ली, उम्रोली, कोप्रोली त्याचप्रमाणे उरणमध्ये ही रुग्ण आढळत आहेत. संबंधितांवर उपचार करण्यासाठी बेडची कमतरता भासत असल्याने रुग्णांना गैरसोयींना सामोरे जावे लागते. वेळेत उपचार न मिळाल्याने काहींना जीव देखील गमवावा लागला आहे.
सिडकोने मुलुंड येथे अठराशे बेडचे रुग्णालय उभारले आहे. याच पार्श्वभुमीवर महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सुद्धा पत्र दिले आहे. यासाठी माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. मुलुंडच्या धर्तीवर पनवेल आणि उरणसाठी किमान 500 खाटांचे कोविड रुग्णालय सिडकोने तयार करून द्यावे अशी मागणी पाटील यांनी केली आहे. येथे ऑक्सीजन आणि व्हेंटिलेटर बेडची सोय करावी. जेणेकरून कोरोनाशी दोन हात करता येणे शक्य होईल. असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. यासंदर्भात संदीप पाटील यांनी व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांना पत्र दिले आहे. तसेच सिडकोच्या वरिष्ठ अधिकार्यांशी सुद्धा त्यांनी चर्चा केली आहे. त्याचबरोबर नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर त्यांच्याशी संपर्क साधून पाटील यांनी पनवेल उरण परिसरातील वस्तुस्थिती त्यांच्या कानावर घातली. त्यांनाही रीतसर निवेदन
देण्यात आले आहे.
-कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी खाटांची कमतरता; माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांंची मागणी
पनवेल उपजिल्हा रुग्णालय व एमजीएम या दोन्ही हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी खाटा कमी पडत आहेत. म्हणून सिडकोने पनवेल परिसरात कोरोना उपचाराकरीता रुग्णालय तयार करून द्यावे, अशी मागणी आपण केली असल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले. आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू असल्याचेही ते म्हणाले.