आमदार प्रशांत ठाकूर यांचे औद्योगिक क्षेत्रासंदर्भात जिल्हाधिकार्यांना निवेदन
पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यातील विविध उद्योगांमधील कंत्राटी व कायमस्वरुपी कामगारांच्या कोरोना उपचाराचा खर्च संबंधित कंपनीने उचलण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे महत्त्वपूर्ण अशी सूचनावजा मागणी केली आहे. या संदर्भात आमदार ठाकूर यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदनही दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, सद्यस्थितीत रायगड जिल्ह्यातील विविध औद्योगिक क्षेत्रांमधील काही कंपन्या या सामाजिक सुरक्षेचे नियम पायदळी तुडवित आहेत. कित्येक कंपन्यांमध्ये मास्क न वापरणे, एकत्र जेवण करणे व निकषांपेक्षा (प्रत्येकी तीन फूट) कमी अंतर पाळले जात असल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग अनेकांना होत असून, कंपनी व्यवस्थापनाकडून याबाबत आवश्यक ती काळजी घेतली जात नाही. अनेक कंपन्यांमार्फत त्यांच्या कायमस्वरुपी व कंत्राटी कामगारांवर कामावर येण्याची सक्ती केली जात असताना शारिरीक अंतर अथवा सामाजिक सुरक्षेचे निकष पाळले तर जातच नाहीत, शिवाय उद्योगामध्ये काम करताना कोरोनाची लागण होऊनही अशा कामगारांच्या उपचारावर मदत मिळवून देण्याऐवजी त्यांना वार्यावर सोडले जात आहे. या संदर्भात रायगड जिल्ह्यातील कामगार उपायुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, कामगार अधिकारी (लेबर ऑफिसर) यांनी सद्यस्थितीत सुरू असणार्या कंपन्यांमध्ये कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणती पाऊले उचलण्यात येत आहेत व दक्षता घेण्यात येत आहेत याची माहिती व जबाबदारी घ्यावी तसेच ज्या कंपन्या अशी काळजी घेण्यास असमर्थ असतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
सध्यस्थितीत शासकीय रुग्णालयामध्ये क्षमता अपुरी पडत असल्याने कोरोनाची लागण झालेल्या अनेकांना खासगी रुग्णालयात एकतर जागा मिळत नाही आणि ज्यांना मिळते त्यांना प्रचंड खर्च सोसावा लागतो. जर उद्योजकांना त्यांचे उत्पादन घेण्यासाठी कारखाना चालवणे आवश्यक असेल, तर त्या उद्योगांमधील कंत्राटी व कायमस्वरुपी कामगारांच्या खासगी हॉस्पिटलच्या खर्चाची जबाबदारीदेखील गेली पाहिजे. यासाठी आपणामार्फत योग्य ते निर्देश तातडीने दिले जावेत, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.