महाड ः प्रतिनिधी – महाड शहरातून अवैध दारूची वाहतूक करण्यात येत असल्याची खबर महाड शहर पोलिसांना मिळाल्यानंतर शहरातील गांधारी नाका येथे पोलिसांनी धडक कारवाई केली. या वेळी पोलिसांनी वाहनासह दारू जप्त केली असून या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.
महाड शहर पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून रविवार (दि. 12) गांधारी नाका परिसरात उभ्या असलेल्या वाहनाची तपासणी केली असता गाडीमध्ये विदेशी बनावटीची 94 हजार रुपये किमतीची बेकायदेशीर दारू आढळून आली. या वेळी दारू आणि तीन लाखांच्या गाडीसह दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुनील आणि अब्दुल अशी या दोन आरोपींची नावे आहेत. या दोघांवर भा. दं. वि. कलम 65 (इ) 83 महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. बी. अवसरमोल, पोलीस नाईक नितीन कोंडाळकर, उपनिरीक्षक डी. पी. काळे व त्यांच्या सहकार्यांनी ही धडक कारवाई केली.