पर्यटकांची संख्या रोडावली
मुरूड ः प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रायगड जिल्हाधिकार्यांनी एका आदेशान्वये ऐतिहासिक जंजिरा किल्ला 2 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाचा पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. विविध ठिकाणांहून अनेक पर्यटक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येतात. यामध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश असतो, परंतु अचानक किल्ला पर्यटकांसाठी बंद झाल्याने येथील हॉटेल, लॉजिंग आणि किरकोळ व्यापार्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
ख्रिसमसच्या सुट्यांनिमित्त हजारोंच्या संख्येने पर्यटक समुद्रकिनारी येतात. ऐतिहासिक जंजिरा किल्ला पर्यटकांचे आवडते स्थळ असून सलग सुट्या पडल्यास दिवसाला 20 हजार पर्यटक किल्ला पाहण्यासाठी येतात. जंजिरा किल्ला सुरू होताच राजपुरी नवीन जेट्टीचा परिसर पर्यटकांनी फुलला होता. जेट्टीवर विविध व्यवसाय सुरू होते. शहाळी, सरबत, टोपी व गॉगल विक्रेते, वाहन पार्किंग करणारे, जलवाहतूक संस्था, शिडाच्या बोटीने पर्यटकांना किल्ल्यावर सोडणारे मजूर अशा अनेकांना दिवसाला किमान दोन हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत असे, परंतु किल्ला बंद होताच या सर्वांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मुळातच जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खूप उशिरा सुरू करण्यात आला. त्यामुळे येथे फार थोड्या कालावधीसाठी रोजगार मिळाला होता, परंतु जिल्हाधिकार्यांच्या आदेशामुळे या सर्वांना रोजगार गमवावा लागून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.नाताळची सुटी शुक्रवारी व लागूनच शनिवार-रविवार सुटी असल्याने हजारो पर्यटकांचे थवे मुरूड व काशिद समुद्रकिनारी आले होते. यातील पुष्कळ पर्यटक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी गेले, परंतु किल्ला बंद असल्याने त्यांना माघारी परतावे लागले. परिणामी पर्यटक न फिरकल्याने स्थानिकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे.