Breaking News

वाशी खाडीवरील पुलासाठी सिडकोचे सहाय्य

पर्यावरणविषयक परवानगीसाठी केंद्राकडे पाठपुरावा; वाहतुकीची कोंडी सुटणार

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : राज्याच्या पायाभूत सुविद्या समितीने दोन वर्षांपूर्वी हिरवा कंदील दिलेल्या वाशी खाडीपुलावरील तिसर्‍या पुलावर 775 कोटी रुपये खर्च केले जाणार असून, मागील वर्षी पात्रता स्वारस्य निविदा पूर्ण केल्यानंतर हे काम सुरू होणार होते. सिडकोने या प्रकल्पासाठी दोनशे कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवलेली आहे.

मुंबई-नवी मुंबईला जोडणार्‍या वाशी खाडी पुलावरील दोन पुलांवर सकाळ-संध्याकाळ होणार्‍या प्रचंड वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून राज्य रस्ते विकास महामंडळाने ऑक्टोबर 2016मध्ये पर्यायी उड्डाणपुलासाठी पाहणी केली होती. त्यानंतर या दोन खाडीपुलाजवळ तिसरा पूल कसा बांधता येईल यासाठी एका खाजगी संस्थेने पुलाचा अभ्यास अहवाल तयार केला आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात या संस्थेच्या सर्वेक्षणाला एमएसआरडीसी व नंतर सरकारच्या पायाभूत सुविधा समितीने हिरवा कंदील दाखविला होता. सुमारे 775 कोटी 58 लाख रुपये खर्चाच्या या पुलासाठी गेल्या वर्षी प्रथम स्वारस्य निविदा काढण्यात आली होती. त्यात पाच कंत्राटदारांनी रस दाखविला होता. यंदा मार्च महिन्यात या पुलाच्या उभारणीला सुरुवात होणार होती, पण ते काम पर्यावरणविषयक परवानगी अद्याप प्राप्त न झाल्याने रखडले असल्याचे दिसून येत आहे.

सिडको स्थापनेपूर्वी मुंबई व नवी मुंबईला जोडणारा खाडीपूल नव्हता. त्यामुळे मुंबईकर ठाणेमार्गे पुणे किंवा गोव्याला जात होते, तर नवी मुंबईकर छोट्या बोटीने किंवा ओहोटीच्या वेळी चालत मुंबईला जात होते. त्यानंतर 1971 मध्ये या खाडीवर पहिल्या पुलाची उभारणी करण्यात आली. पहिल्यांदा केवळ 12 हजार वाहनांची दिवसाला ये-जा होईल असा सर्व्हे असताना आज अडीच लाखांपेक्षा जास्त वाहने या पुलावरून ये-जा करीत आहेत. शीव-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण झाल्यापासून ही संख्या वाढली आहे. त्यामुळे शीव-पनवेल महामार्ग 10 पदरी आणि टोल नाक्यापुढील खाडीपूल सहा पदरी असल्याने या कोंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे. तिसर्‍या पुलाचे काम पुढील महिन्यात सुरू होईल, असे एमएसआरडीसी सूत्रांनी सांगितले.

तिसर्‍या पुलाची नितांत गरज

पहिला पूल अपुरा पडू लागल्याने 20 वर्षांनी एक हजार 200 कोटी रुपये खर्च करून दुसरा पूल बांधण्यात आला. त्यामुळे पहिला पूल जड वाहनांसाठी बंद करण्यात आला असून काही महिन्यांपूर्वी दुसर्‍या पुलालाही तडे गेल्याने एक महिना पुलाची एक बाजू बंद ठेवण्यात आली होती. त्या वेळी होणारी वाहतूक कोंडी अतिशय अभूतपूर्व होती. त्यामुळे तिसर्‍या पुलाची नितांत गरज असताना या पुलाच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे दोन्ही पुलाच्या दुतर्फा सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. या महिन्यात कामाला सुरुवात झाल्यानंतर तीन वर्षांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. परवानगी लवकर न मिळाल्यास हे काम रखडण्याची शक्यता आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply