Breaking News

वावळोली आश्रमशाळेतील साहित्य झाले खराब

पाली : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळात रायगड जिल्ह्यामध्ये जीवित हानी तसेच कोट्यवधी रुपयांची वित्तहानी झाली. घरे, शाळा, वाडे, झाडे जमीनदोस्त झाली. यात सुधागड तालुक्यातील वावळोली आश्रमशाळेचेदेखील मोठे नुकसान झाले. येथील तब्बल 560 विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यासह दैनंदिन वापरातील वस्तू भिजून पूर्णपणे खराब झाल्या आहेत. त्यामुळे या सर्व साहित्य व वस्तूंची आता विद्यार्थ्यांना गरज असून समाजसेवी संस्था व दानशूर व्यक्तींनी आदिवासी मुलांच्या मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे.

वावळोतील आश्रमशाळा हे विद्यार्थ्यांचे दुसरे घरच आहे. पहिलीत प्रवेश झाल्यावर अगदी बारावीपर्यंत त्याला इथे शिक्षण मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांची पुस्तके, वह्या, शैक्षणिक साहित्य, कपडे, अंथरूण व इतर दैनंदिन वापरातील सर्व साहित्य आश्रमशाळेतील निवासी खोल्यांमध्येच ठेवलेले असते. कोरोना आणि लॉकडाऊनमूळे आश्रमशाळा बंद असून विद्यार्थी त्यांच्या घरी आहेत.

निसर्ग चक्रीवादळात आश्रमशाळेचे छत उडाले तसेच नुकसान झाले आणि सर्व शैक्षणिक व दैनंदिन वापरातील साहित्य अक्षरशः मातीमोल झाले आहे. आश्रमशाळा सुरू झाल्यावर आदिवासी मुलांकडे ना पुस्तके, वह्या असणार; ना कपड व वापरासाठी वस्तू! मग ही मुले अभ्यास कुठे करणार आणि राहणार कशी, हा प्रश्न आहे. इयत्ता पहिली ते आठवीची पुस्तके शासनाकडून मिळाली आहेत, मात्र त्या विद्यार्थ्यांनादेखील इतर शैक्षणिक साहित्य व वस्तूंची गरज आहे. म्हणूनच या आदिवासी मुलांना पुन्हा नव्याने शिक्षण घेण्यासाठी व जगण्यासाठी सर्व साहित्याची आवश्यकता आहे.

चक्रीवादळामुळे विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक साहित्य, कपडे, अंथरूण व इतर साहित्य भिजून पूर्णपणे खराब झाले आहे. म्हणून समाजसेवी संस्था व दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन जमेल तशी मदत करावी.

-सरिता सावंत, मुख्याध्यापिका, वावळोली आश्रमशाळा

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply