दोन कामगारांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
येथील इंडिया स्टील या कारखान्यात मंगळवारी (दि. 14) मध्यरात्री गॅस टँकचा भीषण स्फोट होऊन दोन कामगार जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याला कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिनेश वामन चव्हाण (वय 55, रा. लक्ष्मीनगर, खोपोली) व प्रमोद दुधनाथ शर्मा (30, सुभाषनगर-वासरंग, खोपोली) अशी मृत कामगारांची नावे आहेत, तर सुभाष धोंडीबा वांजळे (55) जखमी झाला आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की या आवाजाने खोपोली हादरली. दोन्ही कामागारांच्या शरीराचे छिन्न-विछिन्न तुकडे झाले असून, पॉलिथिन पिशवीत ते भरून खोपोली नगर परिषद रुग्णालयात आणण्यात आले.
दरम्यान, मृताच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसूरकर, नगरसेवक मंगेश दळवी व भाजपचे दिलीप देशमुख यांनी केली तर तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने कारखाना परिसरात वातावरण तंग झाले होते. अखेर कारखाना व्यवस्थापकांबरोबर चर्चा झाली व त्यांनी वरिष्ठांशी बोलणी सुरू असल्याचे सांगितले. दरम्यान, प्रेत शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आले. या दुर्घटनेचे कारण अद्याप समजले नाही. सायंकाळी उशिरापर्यंत याबाबत चौकशी सुरू होती.