Breaking News

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची बाजारपेठेत धाव

रायगडात खरेदीसाठी झुंबड

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात 15 ते 24 जुलै या कालावधीत टाळेबंदी (लॉकडाऊन) जाहीर करण्यात आली आहे. 10 दिवसांसाठी आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी मंगळवारी (दि. 14) नागरिकांची बाजारपेठांमध्ये झुंबड उडाली होती. त्यामुळे
सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले. किराणा मालाच्या दुकानासमोर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अशातच भाजी विके्रत्यांनी अचानक दरवाढ करून ग्राहकांची लूट केली.
रायगड जिल्ह्यात 15 जुलैच्या रात्री 12 वाजल्यापासून ते 24 जुलैला रात्री 12 वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या काळात रुग्णालये, दवाखाने, औषधाची दुकाने या अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत तसेच प्रक्रिया करणारे कारखाने, रासायनिक व औषध निर्मिती करणारे कारखाने सुरू राहतील. दुसरीकडे किराणा मालाची दुकाने, भाजीपाला, मटण, मासळी विक्री तसेच मद्य विक्री बंद ठेवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर लोक मंगळवारी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले.
पहिल्या लॉकडाऊनमध्ये किराणा मालची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. 15 जुलैपासूनच्या लॉकडाऊनमध्ये मात्र किराणा मालाची दुकानेदेखील बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे मंगळवारी किराणा खरेदीसाठी लोकांनी दुकानांमध्ये गर्दी केली होती. खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या. भाजी बाजारात तर जणू जत्राच भरली होती. लोकांच्या तोंडाला मास्क होता, परंतु सोशल डिस्टन्सिंग कुठेच दिसले नाही. ग्रामीण भागातून
नागरिक शहरात मोठ्या संख्येने खरेदीसाठी आले होते. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागला.
दरम्यान, सकाळपासूनच मद्यविक्रीच्या दुकानांबाहेर लोक रांगेत उभे राहून दारू खरेदी करीत होते. 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर झाला असला तरी तो वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्या लॉकडाऊनचा अनुभव लक्षात घेता कोणताही धोका पत्करायला मद्यप्रेमी तयार नाहीत, असेच दिसून आले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply