Breaking News

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पनवेल महानगरपालिकेतर्फे अभिवादन

पनवेल : प्रतिनिधी

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त पनवेल महापालिकेतर्फे आदरांजली वाहण्यात आली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, आयुक्त सुधाकर देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर, तहसीलदार विजय तळेकर उपस्थित होते. या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा समाज निर्माण व्हावा, वंचित समाजाला जगण्याची समान संधी उपलब्ध होण्यासाठी येणार्‍या कालावधीमध्ये जे जे प्रयत्न, कार्यक्रम राबविण्यात येतील त्यासाठी शुभेच्छा दिल्या, तसेच महापालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराचे कमीत कमी कालावधीत उत्तम सुशोभीकरण केल्याबद्दल महापौर आणि आयुक्तांचे विशेष अभिनंदन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम भव्य-दिव्य करता आला नाही. कमी वेळेत या परिसराचे बदललेले रूप उल्लेखनीय आहे, सर्व पनवेलकरांच्या वतीने पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारीवर्गाचे त्यांनी या वेळी आभार मानले. महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी, सुशोभिकरणानंतर अभिवादन करण्यास अभिमान वाटत असून कोरोनाच्या कारणांमुळे नियमांचे पालन करीत या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करीत गर्दी न करता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली व्हावी, असे आवाहनही त्यांनी केले. आयुक्त सुधाकर देशमुख यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाचे काम आव्हानात्मक होते. कमी जागेत कागदावर तयार केलेला आराखडा प्रत्यक्षात उतरविणे अवघड होते, परंतु सर्वांच्या सहकार्याने हे शक्य झाले. या कामाप्रती विविध संघटना व लोकप्रतिनिधींनी केलेली मदत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. कोरोना नियमांचे पालन करीत मर्यादित उपस्थितीत कार्यक्रम झाला.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply