अलिबाग ः प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील आवास भगतआळीमध्ये खारफुटीची कत्तल होत आहे, तसेच खाडीकिनारी बेकायदा भराव केला जात आहे. त्यामुळे अशा प्रकारे बेकायदा भराव करणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भगतआळीतील ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
आवास ग्रामपंचायतीच्या हद्दीत भगतआळी येथे खारफुटीची कत्तल तसेच भरावदेखील केला जात आहे. ही जागा हडप करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा भराव असाच सुरू राहिला तर समुद्राचे पाणी मानवी वस्तीमध्ये घुसण्याची भीती आहे. भविष्यातील हा धोका ओळखून खारफुटीची कत्तल करून जागा हडप करणार्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आवास भगतआळी येथील रहिवाशांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.