Breaking News

पोलीस भरतीविषयक ऑनलाइन मार्गदर्शन

अलिबाग ः प्रतिनिधी

महाराष्ट्रात लवकरच मोठी पोलीस भरती होणार असून, या भरती प्रक्रियेविषयक मार्गदर्शन व्हावे, प्रत्येक बारकावे समजून घ्यावेत यासाठी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी मोफत ऑनलाइन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पहिल्यांदाच पोलीस भरती ऑनलाइन (फेसबुक लाइव्ह) मार्गदर्शनपर संवाद कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर पोलीस भरती मार्गदर्शन गुरुवारी (दि. 16) सायंकाळी 7 वाजता /NiranjanDavkhare या फेसबुक पेजवरून होणार आहे. बारामती येथील सह्याद्री करिअर अ‍ॅकॅडमीचे संचालक व पोलीस भरती पुस्तकांचे लेखक उमेश रुपनवर या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत. या मार्गदर्शनपर कार्यक्रमात पोलीस भरतीचे बदललेले निकष व पात्रता, पोलीस भरतीसाठी लागणारी कागदपत्रे, आरक्षण, पोलीस भरतीसाठी अचूक जिल्हा निवड, पोलीस भरतीचे नवीन जीआर, मैदानी चाचणी व लेखी परीक्षा यामधील बदल व बारकावे या सर्व घटकांवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. एकंदरीत बदललेल्या पोलीस भरती प्रक्रियेला सामोरे जाऊन यशस्वी होण्याचा कानमंत्र ऑनलाइन मार्गदर्शन कार्यक्रमात दिला जाणार आहे. तरी इच्छुक मुला-मुलींनी व त्यांच्या पालकांनी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक आमदार निरंजन डावखरे यांनी केले आहे.

रोटरी क्लबतर्फे मास्कवाटप

मुरूड ः प्रतिनिधी

रोटरी क्लब ऑफ अलिबाग सीशोअरतर्फे नुकतेेच विविध ठिकाणी सुमारे 250 चांगल्या दर्जाच्या मास्कचे वाटप करण्यात आले. अलिबाग बस स्टँडजवळील भाजीवाले, फळवाले, मिनीडोअर व पोलिसांना मास्कचे वाटप करण्यात आले. रोटरी क्लबतर्फे अध्यक्ष डॉ. किरण नाबर, कार्यवाह निमिष परब, खजिनदार डॉ. राजेंद्र चांदोरकर तसेच डॉ. दीपक गोसावी, दिलीप भड, सुधीर काटले आदी सदस्य या वेळी उपस्थित होते. पोलिसांतर्फे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोल्हे यांनी, तर मिनीडोअर संघटनेतर्फे कार्यकारी अध्यक्ष दीपक म्हात्रे यांनी मास्क स्वीकारले. या उपक्रमाबाबत माहिती देताना रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. किरण नाबर यांनी सांगितले की, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे अनिवार्य आहे. लोकांच्या आरोग्यासाठी रोटरी क्लबतर्फे आम्ही मास्कवाटप केले असून जास्तीत जास्त लोक सुरक्षित ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply