मोहोपाडा : प्रतिनिधी
अत्यंत बिकट परिस्थितीत या परिसरातील शेतकर्यांनी भातलावणीचे काम पूर्ण केल्याने त्याच्या चेहर्यावर समाधान आहे. कोरोनाने जगभरात थैमान घातले आहेच, आणि त्यात भर म्हणून कोकणात निसर्गचक्री वादळाने गावोगावी थैमान घातले, पणशांत बसेल तो कोकणातील शेतकरी कसा? निसर्गचक्री वादळाचा कोप झाला, पण दमदार पावसाने शेतकर्याला दिलासा दिला. त्याने शेतीची कामे पूर्ण केली.
कोरोना, लॉकडाऊन यातून भातलावणीस मजूर मिळणे कठीण, मजुरांची मजुरी ही न परवडणारी, तसेच आर्थिक चणचण, शेतीला लागणारे खत, बियाणे मजुरांची मजुरी, त्यांचे जेवणखाण यासाठी पैसा नाही. या सर्वांवर मात करीत त्याने आपल्याकडे असणार्या शेतीची उत्तम मशागत करून भातलावणीचे काम पूर्ण केले आहे.आर्थिक मंदी, कोरोना, लॉकडाऊन, संचारबंदी, मजुरांची वानवा, मजुरी जास्त यामुळे शेती करायची की नाही असा प्रश्न कोकणातील शेतकर्यांसाठी उपस्थित झाला नाही. त्यातच सर्व कुटुंबातील सदस्य यांनी भातलावणीच्या कामाला हातभार लावला व शेजारी शेतकरी याच्याही मदतीला तो धावला. भातलावणीच्या कामाला एकूण किती खर्च झाला, त्यातून पुढे खत मारणे, बेननी करणे, भटक्या जनावरांपासून भातशेतीचे संरक्षण करणे, पुढचा पाऊस कसा आहे? येणारे भातपीक उत्पादन देणारे आहे का? याचा तो कधीही विचार करीत नाही. त्यामुळेच तो सुखावला आहे.