उरण : प्रतिनिधी, वार्ताहर
उरण तालुक्यातील बहुतांशी मटण विक्रेत्यांच्या दुकानासमोर गटारी अमावस्येनिमित्त मटण खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसत होते. गटारी रविवारी (दि.19) आल्याने मटण-चिकन खवय्ये पहाटेपासूनच लांबच लांब रांगा लाऊन व कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये त्याकरिता स्वत:ची सुरक्षा म्हणून मास्क व सोशल डिस्टन्सिंग पाळून मटण-चिकन खरेदी करताना दिसत होते. तर काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.
मागील साडेतीन महिन्यांपूर्वी उरण तालुक्यात कोरोनाचा प्रादूर्भाव सुरू झाला. मात्र करंजा येथील रुग्ण वगळता हा संसर्ग आटोक्यात ठेवण्यात आरोग्य विभाग आणि इतर प्रशासनाला यश मिळत होते. परंतु मागील एक महिन्यापासून कोरोना संसर्गाने मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा कहर सुरू झाला असून, तो कमी होण्याचे नावच घेत नाही. उरण तालुक्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 609 एवढे रुग्ण आढळून आले असून, कोरोनाने जनतेच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र झटत असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसह कर्मचार्यांनाही सोडले नाही.
त्यामुळे शासन स्तरावर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. त्याचप्रमाणे कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होण्यासाठी 15 ते 26 जुलैपर्यंत लॉकडाऊन केले असून, नागरिकांची उपासमार होऊ नये यासाठी नागरिकांच्या मागणीवरून आत्ताच्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत दूध विक्री दुकाने, किराणा सामान, फळे व भाजीपाला, चिकन, मटण, अंडी व मासे विक्रीची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. मात्र येथील नागरिक किरकोळ कारणासाठी बाजारपेठेत गर्दी करून कोरोनाला आमंत्रित करीत आहेत. तालुक्यातील चिरनेर, कोप्रोली, पिरकोन, वशेणी, भेंडखळ, दास्तानफाटा, चिर्ले दिघोडेसह उरण शहरातील कोटगाव, आनंदनगर, करंजारोड, मुलेखंड फाटा, केगाव, बोरी, पेन्शनर पार्क, मुलेखंड फाटा, भवरा, उरण मच्छी मार्केट समोर आदी ठिकाणी चिकन व मटणची दुकाने थाटण्यात आली होती. चिकन 240 रुपये किलो तर बोकडाचे मटण 800 रुपये किलो या दराने विकले जात होते. दिलेल्या वेळेच्या नंतरही चिकन-मटणाच्या दुकानांसमोर मोठी गर्दी होती.
ग्राहकांच्या लांबच लांब रांगा
चार महिन्यांपासून फैलावत असलेल्या कोरोना संसर्गाच्या विषाणूमुळे जगभरात लाखो नागरिक कोरोना बाधित झाले आहे. कित्येक निष्पाप नागरिकांना स्वतःच्या जीवाला मुकावे लागल्याच्या दुर्घटना सुरू आहेत. तरी देखील उरण तालुक्यातील नागरिक कोरोना संसर्गाच्या भितीला धुडकावत मटण विक्रेत्याच्या दुकानासमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सोशल डिस्टन्सिंगचे भान विसरून मोठ्या रांगेत एकापाठोपाठ गर्दीचे साम्राज्य निर्माण करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते.