शेतकर्यांचे प्रचंड नुकसान
माणगाव ः प्रतिनिधी – माणगावातील अनेक शेतकर्यांनी यंदा पावसाळ्यापूर्वी माळरानावर मोठ्या प्रमाणात काकडीची लागवड केली होती. सुरुवातीच्या पावसात चांगली रुजून गेल्या आठ-दहा दिवसांपासून काकडी तयार झाली. शेतकर्यांनी काकडीचे एक-दोन तोडे बाजारात विकले व आर्थिक उत्पादन सुरू झाले, मात्र उत्पादन सुरू असतानाच जिल्ह्यात 15 जुलैपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन जाहीर झाले. त्यामुळे तयार होणारी काकडी विकायची कोठे व कोणाला, असा प्रश्न काकडी उत्पादक शेतकर्यांना पडला आहे.
श्रावण महिन्यात भाजीपाला, काकडी यांना चांगली मागणी असते. याच काळात शेतकर्यांना चार पैसे मिळतात, मात्र लॉकडाऊन सुरू झाल्याने शेतकर्यांसमोर काकडी विकण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. माणगाव तालुका विविध पावसाळी पिकांसाठी प्रसिद्ध आहे. भातशेतीसह मिरची, भाजीपाला व काकडीची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.
जिल्ह्यात माणगावची काकडी प्रसिद्ध असून महाड, पनवेल, पेण आदी बाजारपेठांतून या काकडीला चांगली मागणी आहे. नामदेव उमाजी, पद्मिनी, झेनिया आदी बियाणांची काकडी लागवड केली जाते. साधारणतः शंभर ते दीडशे एकर जमिनीवर माणगावात काकडी व भाजीपाला लागवड होते. मार्च महिन्यात कलिंगड हंगामातही लॉकडाऊन झाल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे काकडी उत्पादनातून शेतकर्यांना मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र ऐन हंगामात पुन्हा लॉकडाऊन जाहीर झाल्याने शेतकरी संकटात
सापडले आहेत.
दरवर्षी शेतकर्यांना काकडीच्या विक्रीतून चांगला नफा मिळतो. भातशेतीबरोबर काकडीची लागवड म्हणजे हमखास आर्थिक गणित सावरले जात होते, मात्र लॉकडाऊनमुळे हे पीकही वाया जात आहे. काकडीचे दोन तोडे झाले व लॉकडाऊन लागले.त्यामुळे शेतकर्यांची पूर्ण निराशा झाली आहे. हातचे आलेले पीक असे वाया गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
-रामदास जाधव, शेतकरी, माणगाव