खोपोली : प्रतिनिधी
स्फोट होऊन दोन कामगारांच्या मृत्यूप्रकरणी खोपोली येथील इंडिया स्टील कंपनीवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इंडिया स्टील कारखान्यात 14 जुलैच्या मध्यरात्री प्रचंड स्फोट होऊन दोन कामगारांचा जागीच मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला होता. सिलिंडरचा हा स्फोट इतका प्रचंड होता की विहारी, सिद्धार्थनगर हा परिसर हादरला, तर रहिवासी घाबरून घराबाहेर पडले होते. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये असंतोष पसरून यापूर्वीही अशाच प्रकारे घडलेल्या घटनांमुळे हा कारखानाच बंद करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर पोलिसांनी कंपनीवर गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.