Breaking News

माथेरान घाट, कर्जत-कल्याण रस्त्यावर झाडे कोसळली

कर्जत : बातमीदार

संततधार पावसाने गेले दोन दिवस कर्जत तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. रविवारी (दि. 28) सलग तिसर्‍या दिवशीही नेरळ-माथेरान घाटात झाडे आणि दरडी कोसळल्या आहेत. त्याचप्रमाणे रविवारी सकाळी कर्जत-कल्याण रस्त्यावर दरड आणि झाड कोसळल्यामुळे या राज्य मार्गावरील एक मार्गिका बंद होती.

कर्जत तालुक्यात 24 तासांत सुमारे 400 मिली पाऊस झाला होता. तालुक्याच्या सर्व भागात होत असलेल्या पावसामुळे झाडे कोसळण्याच्या घटना घडत आहेत. नेरळ-माथेरान घाटात सलग तिसर्‍या दिवशी झाडे कोसळली असून रविवारी दुपारी घाटातील नांगरखिंड भागात दरड कोसळली. त्या झाडासोबत मोठ्या प्रमाणात माती खाली आल्याने घाटातील वाहतूक मंदावली होती. नेरळ-माथेरान टॅक्सी संघटनेच्या सदस्यांनी झाडे रस्त्यावरून बाजूला करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबी मशीन पाठवले. तेथे नेरळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रवींद्र शेडगे हे वाहतूक नियंत्रण करीत होते.

कर्जत-कल्याण राज्यमार्गावर पंचवटी येथे दरड कोसळणार म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याने हा मार्ग शनिवारी बंद ठेवला होता, मात्र या बंद ठेवलेल्या रस्त्यावर रविवारी सकाळी दरड कोसळली. त्यावेळी रस्त्यावर कोसळलेले झाड मोठे असल्याने तेथील रस्त्याच्या दोन्ही लेन झाकल्या गेल्या. नेरळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रतीलाल तडवी यांनी दोन्ही बाजूची वाहतूक एका बाजूने वळवून कोणताही अपघात होणार नाही याची काळजी घेतली. दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी तेथे स्वतः उभे राहून जेसीबी मशीनच्या सहाय्याने रस्त्यावरील दरड बाजूला केली. त्यानंतर दीड दिवसापासून वाहतुकीसाठी बंद असलेल्या रस्त्याचा भाग रविवारी सायंकाळी सुरू झाला. त्यामुळे धीमी झालेली वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply