Breaking News

होळीची धुंदी नडली; पोलिसालाच केली धक्काबुक्की

पनवेल ः वार्ताहर

संपूर्ण देशभरासह महाराष्ट्रात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. विशेषतः कोकणातील होळीचा सण व शिमगोत्सवाचा जल्लोष सातासमुद्रापार जाऊन पोहचला आहे. मोठी होळी झाली की दुसर्‍या दिवशी धूळवड असते.

धूळवडीच्या दिवशी प्रामुख्याने मुंबईपासून  पनवेलपर्यंतचा परिसर रंगपंचमी साजरी करतो, मात्र महाराष्ट्रात त्यानंतर पाच दिवसांनी रंगपंचमी साजरी केली जाते. नुकताच धूळवडीचा सण पनवेल शहरातही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, मात्र काही नशेबाज तरुणांकडून पोलीस कर्मचार्‍यांवर धावून जाण्याचा प्रकार घडल्यामुळे अखेर खांदेश्वर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवीन पनवेल येथील आदई सर्कल येथे वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी धूळवडीच्या दिवशी वाहन तपासणी, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह, विनापरवाना वाहन चालविणे आदी नियमांची अंमलबजावणी होण्यासाठी तपासणी करीत होते. या वेळी सुकापूर येथे राहणारा सुनील सोनी (29) हा आपली मोटारसायकल घेऊन आपले मित्र किशोर वर्मा, अमिता पांडे तसेच अजून एक अनोळखी इसम असे आले असता तपासणी करणारे पोलीस नाईक किरण सोनावणे यांनी यातील सुनील सोनीला गाडीची कागदपत्रे तपासण्यासाठी थांबविले, मात्र या वेळी सुनील मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्यांनी सुनीलला ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनमध्ये फुंकर मारण्यास सांगितले. या वेळी सुनीलने यास नकार दिला. या वेळी त्याच्यासोबत असलेल्या किशोर वर्माने मोबाइलवर शूटिंग काढून पोलिसांना बघून घेण्याची धमकी दिली, तर अमिता पांडे व एक जण यांनी त्यांना सोडविण्यासाठी पोलिसांना धक्काबुक्की करीत आरडाओरड करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या वेळी झालेल्या गर्दीचा फायदा घेत सुनीलचे अन्य मित्र फरार झाले असले तरी सुनील सोनी हा पोलिसांच्या हाती लागला. खांदेश्वर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून आरोपीला त्यांच्या हवाली करण्यात आले. या वेळी खांदेश्वर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम 353, 332, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध खांदेश्वर पोलीस घेत आहेत.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply