Breaking News

दि. बा. पाटील सर्वपक्षीय संघर्ष समितीचा सिडको मास हाऊसिंगला तीव्र विरोध

पनवेल : रामप्रहर वृत्त
खारकोपर, कामोठे, बामणडोंगरी व तळोजा येथील रेल्वेस्थानकांसमोरील नियोजित पार्किंग जागा व मैदानावर सिडकोने जबरदस्तीने पंतप्रधान आवास योजना राबविण्याचे कट-कारस्थान रचले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या दि. बा. पाटील सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या नेत्यांनी त्यास समितीचे अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र विरोध दर्शविला आहे.
या संदर्भात सोमवारी (दि. 20) उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सर्वपक्षीय समितीचे नेते, कार्यकर्ते आणि सिडकोचे अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलाविण्यात आली होती. या वेळी समितीचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, संघटनेचे उपाध्यक्ष बबन पाटील यांनी सांगितले की, आमचा मास हाऊसिंगला विरोध नाही, मात्र सिडको संपादित शेकडो हेक्टर जमीन बाजूला पडीक असताना, 21व्या शतकातील सुंदर शहरांचे स्वप्न दाखविण्यार्‍या सिडको प्रशासनाने आधीच्या नियोजनाचा खून करून पार्किंग व मैदानांच्या जागांवर मास हाऊसिंगच्या इमारती उभारण्याचा घाट घालत या शहरांची धारावी झोपडपट्टी करण्याचा चंग बांधला आहे. आधीच शहरे उभारताना दाखवलेली नागरी सुविधांची स्वप्ने कागदावर राहिलेली आहेत. अपुरा पाणीपुरवठा, दोन लाख लोकसंख्या येऊनही उलवे नोडमध्ये 10 वर्षांत एकही स्मशानभूमी व दफनभूमी नाही. बगीचे व इतर सुविधा पुरविण्यात आलेले अपयश आणि त्यात अजून हजारो घरे उभारण्याचा मूर्खपणा याला आमचा विरोध आहे.
गेली 30 वर्षे प्रकल्पग्रस्त गावांसाठी नागरी सुविधांवर एकूण उलाढालीच्या पाच टक्के खर्च करण्याचे आश्वासन हवेतच विरलेले आहे. या व अनेक गोष्टींमुळे संतप्त झालेले स्थानिक प्रकल्पग्रस्त तसेच उलवे, कामोठे, तळोजे नोडमधील रहिवाशांनी प्रचंड संताप व्यक्त करून सिडको मास हाऊसिंगचे काम बंद पाडले आहे. या प्रकल्पाची जागा न बदल्यास कुठल्याही परिस्थितीत प्रकल्प होऊ देणार नाही, असा सज्जड दमही नेतेमंडळींनी दिला.
या बैठकीस दि. बा. पाटील सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर, उपाध्यक्ष बबन पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील यांच्यासह माजी आमदार मनोहर भोईर, महेंद्र घरत, अरुणशेठ भगत, रविशेठ पाटील, राजेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, तर सिडकोच्या वतीने नवी मुंबई विमानतळाचे मुख्य अभियंता श्री. डायटकर, उलवे नोड मुख्य अभियंता श्री. गोडबोले, मुख्य नियोजनकर श्री. मानकर, कार्यकारी अभियंता श्री. रामोड व इतर अधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्त गावांतील कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply