पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका हद्दीमधील खारघर प्रभागातील इनामपुरी गावामध्ये एका खासगी जमिनीवर हाय टेन्शन विद्युत वाहिनीच्या बाजूलाच मोबाइल टॉवर उभारण्यात येत होता. याबाबत पालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. याबाबत माहिती मिळताच आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशाने मंगळवारी (दि. 21) संध्याकाळी त्याच्यावर प्रभाग अधिकारी दशरथ भंडारी यांनी कारवाई करून तो पाडण्यात आला.
मोबाइल टॉवर कंपनीला सोमवारी 24 तासांत स्वतःहून अनधिकृत बांधकाम काढून घेण्याची नोटीस दिली होती. या नोटीसला संबंधित मोबाइल टॉवर कंपनीने कोणतेही उत्तर दिले नाही, तसेच अनधिकृत बांधकाम सुरूच ठेवले होते. कोरोनाशी लढण्यात प्रशासन व जनता व्यस्त आहे. याचा फायदा कंपनीने घेतला होता. मंगळवारी प्रभाग अधिकारी दशरथ भंडारी यांच्या पथकाने खारघर येथील इनामपुरी गावातील म्हात्रे यांच्या एका खासगी जागेवर विनापरवानगी उभारलेला मोबाइल टॉवर निष्कासित केला. पालिकेची कोणतीही परवानगी न घेता टॉवरचे बांधकाम सुरू होते. अनधिकृत बांधकामाबाबत संबंधितांना 24 तासांची मुदत दिली होती. नोटीसची मुदत संपताच पालिकेमार्फत अनधिकृत बांधकामावर निष्कासन कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.