Breaking News

अलिबागमधील बोडणी ग्रामस्थांचा कोरोना तपासणीस विरोध

अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील बोडणी गावात कोरोनाचा समूह संसर्ग झाला आहे. त्यामुळे तेथील रुग्णांची तपासणी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा, तहसीलदार, पोलीस बुधवारी (दि. 22) बोडणीमध्ये गेले असता, गावातील पॉझिटिव्ह असलेले रुग्ण तसेच इतर गावकर्‍यांनी या सर्वांना हाकलून लावले. ग्रामस्थ तपासणी करून घेत नसल्याने बोडणीमध्ये कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती निर्माण झाली आहे.
अलिबाग तालुक्यात सध्या कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यातील बोडणी गावात आतापर्यंत 72 जणांना कोरोनाची लागण झाली असून, हे गाव कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहे. त्यामुळे जिल्हा व स्थानिक प्रशासनाने बोडणी गावातील वाढता संसर्ग रोखण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ, मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक धर्मराज सोनके, आरोग्य यंत्रणा, पोलीस कर्मचारी, ग्रामपंचायत प्रशासन यांनी गावात जाऊन ग्रामस्थांना आरोग्य तपासणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले, मात्र गावकर्‍यांनी त्यांची ही मागणी धुडकावून लावली. कोरोनामुळे बोडणी गाव कोरोनाबाधित क्षेत्र घोषित असून, तेथील परिसर पूर्णतः सील केलेला आहे. गावात आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना नेण्यासाठी रुग्णवाहिका आणण्यात आली होती. पोलीस फौजफाटाही तैनात करण्यात आला होता, मात्र बोडणीकर आक्रमक होऊन गावात लावलेल्या कंटेन्मेंट झोनचे बॅरिकेट तोडून प्रशासनाबरोबर हुज्जत घालू लागले. गावात पिण्याचे पाणी घेऊन आलेल्या टँकरचे पाणीही गावकर्‍यांनी पाठवून दिले. या गोंधळामुळे प्रशासनाला काढता पाय घ्यावा लागला.  
प्रशासनाकडून करीत असलेली तपासणी ही चुकीची असून, मुद्दामहुन आमचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह देत असल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला. ग्रामस्थांच्या या भूमिकेमुळे गावात कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बोडणीत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गावात आतापर्यंत 72 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. गावातील कोरोनाचा संसर्ग रोखून हे गाव कोरोनामुक्त करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत, मात्र गावकर्‍यांकडून सहकार्य मिळत नाही.
-सचिन शेजाळ, तहसलीदार, अलिबाग

गावकर्‍यांचे आक्षेप
या घटनेबाबत बोलताना बोडणी ग्रामस्थांनी काही आक्षेप नोंदविले आहेत. ग्रामस्थांनुसार आमचे गाव कन्टेंमेन्ट झोन म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे आम्हाला गावाबाहेर जाता येत नाही. परिणामी आम्हाला कुठल्याच सुविधा मिळत नाहीत. गावात भाजीपाला नाही, इतर वस्तूही नाहीत. गावातील लोकांचे कोरोना अहवाल उशिरा येतात. एका व्यक्तीचे कोरोनाने निधन झाल्यानंतर नातेवाइकांना कोणतीही कल्पना न देता त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली. कोरोना पॉझिटिव्ह लोकांना आमच्या गावातील शाळेतच विलगीकरण करून ठेवावे तसेच निसर्ग चक्रीवादळात जे नुकसान झाले आहे त्याची योग्य मदत मिळालेली नाही. तीसुद्धा द्यावी, अशी मागणीही गावकर्‍यांनी केली आहे.

Check Also

मंत्री भरत गोगावले यांचे पनवेलमध्ये जोरदार स्वागत

आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांच्याकडून शुभेच्छा पनवेल ः रामप्रहर वृत्त शिवसेनेचे महाडमधील आमदार भरत …

Leave a Reply