चेन्नई : वृत्तसंस्था
चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सवर सात गडी राखून मात केली. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली असून, पहिल्या क्रमांकावरील कोलकत्ता दुसर्या स्थानकावर घसरला आहे.
कोलकात्याने ठेवलेल्या 109 धावांचा पाठलाग करताना चेन्नईचीही दमछाक झाली. कोलकात्याच्या माफक आव्हानाचा पाठलाग चेन्नईने 17.2 षटकांमध्ये केला. चेन्नईचा सलामीवीर फाफ डु प्लेसिस (43) आणि केदार जाधव (8) धावांवर नाबाद राहिले. चेन्नईची सुरुवात खराब झाली. स्कोअरबोर्डवर 18 धावा असताना शेन वॉटसन 17 धावा करून बाद झाला. सुरेश रैना 14 धावांवर आणि अंबाती रायुडू 21 धावांवर आऊट झाला. कोलकात्याकडून
सुनील नारायणने सर्वाधिक दोन बळी घेतले, तर पीयूष चावलाला एक बळी मिळाला.
या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून कोलकात्याला प्रथम फलंदाजीला बोलावले. चेन्नईने सुरुवातीपासूनच कोलकात्याला धक्के दिले. कोलकात्याची अवस्था एकवेळ 47/6 अशी झाली होती, पण आंद्रे रसेलने पुन्हा एकदा कोलकात्याला सावरले. रसेलने 44 चेंडूंमध्ये 50 धावा केल्या. कोलकात्याचे चार खेळाडू शून्यावर बाद झाले. 20 षटकांमध्ये 9 गडी गमावून 108 धावांपर्यंतच त्यांना मजल मारता आली. चेन्नईकडून दीपक चहरने सर्वाधिक तीन बळी घेतले, तर हरभजन सिंग आणि इम्रान ताहिरला प्रत्येकी दोन बळी घेण्यात यश आले. रवींद्र जडेजाला एक गडी बाद केला.
कोलकात्याविरुद्धच्या या विजयामुळे चेन्नई गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. चेन्नईने आतापर्यंत खेळलेल्या सहापैकी पाच सामने जिंकले, तर एक सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. चेन्नईच्या खात्यात सध्या 10 गुण आहेत, तर कोलकात्याचा संघ दुसर्या क्रमांकावर आहे. कोलकात्याने सहापैकी चार सामने जिंकले आणि दोनमध्ये त्यांना पराभव पत्करला. कोलकात्याच्या खात्यात आठ गुण आहेत.