मुरूड : प्रतिनिधी
कोरोनामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प होऊन सर्वच आर्थिक व्यवहारांना मोठा फटका बसला. जीवनावश्यक वस्तूंशिवाय अन्य कोणत्याही वाहतुकीला परवानगी नसल्याने इतर घटकांची मोठी कोंडी झाली. याचाच फटका फुलविक्रेत्यांनाही बसला असून, मागणी घटल्याने त्यांना तोटा सहन करावा लागत आहे.
पूजा तसेच विवाह व अन्य समारंभांसाठी फुलांना खूप महत्त्व असते. कोरोनाच्या संचारबंदीमुळे मंदिरे, विवाह सोहळ्यांवरही बंधने आली असल्याने बाजारपेठेतील फुलांचा सुगंध हरवला आहे.श्रावण हा व्रतवैकल्यांचा महिना असल्याने विविध फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. त्यानुसार येथील फुलविक्रेते वाशी, पेण, दादर या मंडईतून फुले आणून ती मुरूडच्या बाजारात विकली जातात, पण सध्या मुरूड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे श्रावण महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात फुलविक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून लोक फार कमी बाजारात येतात. त्याचप्रमाणे सातत्याने होणारे लॉकडाऊन व वाहतुकीची साधने बंद यामुळे फुलांचे उत्पादन करणार्या माळ्यांनीसुद्धा नेमकेच उत्पादन घेतल्याने बाजारात फुलांची आवक जास्त नसते. परिणामी फुलविक्रेत्यांना तुटपुंज्या कमाईवर समाधान मानावे लागत आहे.
गेली अनेक वर्षे फुलांचा व्यवसाय करून उपजीविका चालवत आलो आहे, परंतु या वर्षी कोरोनाच्या संकटाचा परिणाम ग्राहकांवर
होऊन आमचा व्यवसाय धुळीस मिळाला आहे.
-राजेश मुळेकर, फुलविक्रेता