Thursday , March 23 2023
Breaking News

भडवळवाडीमधील महिला आक्रमक

कर्जत पंंं.स. वर हंडा मोर्चा नेण्याचा आदिवासी संघटनेचा निर्धार

कर्जत : बातमीदार : कर्जत तालुक्यातील नेरळजवळील दामत ग्रामपंचायतीमधील  भडवळवाडीमध्ये नळपाणी योजनेचे पाणी पोहचत नाही. येथील आणि तालुक्यातील सर्व आदिवासी वाड्यांमधील पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेऊन कर्जत तालुका आदिवासी संघटना पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा नेऊन मनातील खदखद व्यक्त करणार आहे.

भडवळवाडीमधील एक विहीर कोसळली असून दुसरी विहीर कोरडी पडली आहे. त्यात नळपाणी योजनेचे पाणी भडवळवाडीमध्ये पोहचत नाही. परिणामी या आदिवासीवाडीमधील महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी खासगी फार्महाऊसचा आश्रय घ्यावा लागत आहे. गेल्या दीड महिन्यापासून ही स्थिती भडवळवाडीत निर्माण झाली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या भडवळवाडीतील महिला  सोमवारी (दि. 25) दामत ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा घेऊन निघाल्या होत्या. त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर मोर्चा नेऊन ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार केला होता.

मात्र त्याची माहिती मिळताच कर्जत तालुका आदिवासी ठाकूर कातकरी संघटनेचे काही पदाधिकारी भडवळवाडीमध्ये पोहचले. तेथे संघटनेचे जैतू पारधी, वसंत ढोले, सुनील पारधी या पदाधिकार्‍यांसह श्री. शेंडे, दत्ता निर्गुडा, लक्ष्मण उघडा या कार्यकर्त्यांनी सदर महिलांची समजूत काढली, मात्र शांताबाई वाघ, गंगुबाई शिंगवा, मीनाक्षी पारधी यांनी महिलांना पाणी आणण्यासाठी होणारे हाल याबाबत आपली भूमिका सांगण्यास सुरुवात केल्यानंतर मात्र आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते शांत झाले. वाडीमध्ये पाणी पोहचत नसल्याबद्दल ग्रामपंचायतीला जाब विचारू, पण आता शाळांच्या परीक्षा सुरू झाल्याने ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करू नये, असे आवाहन जैतू पारधी यांनी केले. त्यामुळे या महिला काही प्रमाणात शांत झाल्या. पाणीटंचाई असलेल्या भडवळवाडीसारख्या अनेक वाड्या कर्जत तालुक्यात आहेत. त्यांच्या वतीने एकच हंडा मोर्चा काढण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.

भडवळवाडीसाठी नळपाणी योजनेची पाइपलाइन आहे, पण त्या पाइपलाइनमधून वाडीपर्यंत पाणी येत नाही. त्यावर उपाययोजना म्हणून भडवळ गावाच्या टेकडीवर असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ एक नवीन वीजपंप लावून वाडीत पाणी पोहचविण्याचा ग्रामपंचायतचा प्रयत्न आहे.

-कुंदा शिंगवा, सरपंच, ग्रामपंचायत दामत, कर्जत

कर्जत तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्यांत पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. काही ठिकाणी महिलांना रात्र विहिरीवर काढावी लागत आहे. पाण्यासाठी संघटनेच्या वतीने शेकडो आदिवासींचा हंडा मोर्चा काढला जाईल.

-जैतू पारधी, अध्यक्ष, आदिवासी संघटना-कर्जत

Check Also

अलिबाग-रोहा रस्त्याच्या कामाला सुरुवात

आमदार प्रशांत ठाकूर, महेंद्र दळवी यांचा पाठपुरावा अलिबाग ः प्रतिनिधी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बुधवारी (दि. 22) …

Leave a Reply