नवी मुंबई पालिका देणार पुनर्नियुक्तीसहित थकित मानधन
नवी मुंबई : बातमीदार
बारा हजार रुपयांच्या मासिक अल्प वेतनावर काम करणार्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील बालवाडी मदतनिसांना मे 2020 पासूनचे थकित वेतन मिळावे त्याचप्रमाणे त्यांना पुनर्नियुक्तीचे आदेश द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने (शिक्षक नेते कै. शिवाजीराव पाटील अण्णा प्रणित) लावून धरण्यात आली होती. या विषयी आमदार गणेश नाईक यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन या महिलांना न्याय देण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीची दखल घेत आयुक्तांनी तत्काळ या मदतनिसांचे पुनर्नियुक्ती आदेश काढून थकित मानधन देणार असल्याचे आश्वासन लोकनेते आमदार नाईक यांना दिले.
याविषयी माजी महापौर सुधाकर सोनावणे, जैवविविधता समितीचे सभापती तथा ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार यांनी (23 जून रोजी) पालिका आयुक्त, शिक्षण अधिकार्यांना निवेदन देऊन लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी केली होती. भारतीय जनता पक्षाच्या पाठपुराव्याला यश आले असून शेकडो बालवाडी मदतनिसांना दिलासा मिळाला आहे. बालवाडी मदतनीस म्हणून मागील 12 ते 15 वर्षापासून तात्पुरत्या स्वरूपात 12 हजार रुपयांच्याअल्प वेतनावर या महिला कार्यरत आहेत. त्यांच्या नियुक्तीचे आदेश एप्रिल 2020 मध्ये संपुष्टात आले आहे. कोणत्याही कायम अथवा तात्पुरत्या कर्मचार्यांना कामावरून काढू नये तसेच मानधन नियमित देण्याविषयी केंद्र व राज्य सरकारचे स्पष्ट निर्देश आहेत. सध्या कोरोनाच्या महामार्गामुळे या बालवाडी मदतनिसांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. कोरोनाच्या संकटात तुटपुंज्या पगारावर काम करणार्या महिलांना पुनर्नियुक्ती करून बालवाडी मदतनिसांची सेवा विखंडित न करता त्यांना कायम सेवेत करण्याच्या अनुषंगाने पालिका प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी या वेळी शिष्टमंडळाने केली. आयुक्तांच्या समवेत भेटीच्या वेळी माजी आ. संदीप नाईक, महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सुधाकर सोनवणे, जैवविविधता समितीचे सभापती अनंत सुतार, नगरसेवक रामचंद्र घरत, सूरज पाटील, नगरसेविका नेत्रा शिर्के, पा. शिक्षण अधिकारी, बालवाडी सेविका आदी उपस्थित होते.