Breaking News

ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरचे त्रिशतक

ब्रॅडमन, विराट यांनाही टाकले मागे

अ‍ॅडलेड : वृत्तसंस्था

पाकिस्तानविरुद्ध अ‍ॅडलेड येथे सुरू असलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने खणखणीत त्रिशतक ठोकले आहे. गुलाबी चेंडूवर त्याने हे त्रिशतक झळकाविले. पाकविरुद्ध त्रिशतक ठोकणारा ऑस्ट्रेलियाचा तो दुसरा फलंदाज ठरला आहे.

पाकविरुद्ध सुरू असलेल्या या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात तीन गड्यांच्या मोबदल्यात 550 धावांचा डोंगर उभारला आहे. त्यात वॉर्नरच्या नाबाद त्रिशतकाचा समावेश आहे. 389 चेंडूंमध्ये त्याने हे त्रिशतक पूर्ण केले. त्यात 37 चौकारांचा समावेश आहे. तो 335 धावांवर नाबाद राहिला. वॉर्नरने ब्रॅडमन आणि टेलर यांचा विक्रम मोडल्यावर ऑस्ट्रेलियाने डाव घोषित केला.

यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या मार्क टेलर याने 1998मध्ये पेशावर येथे नाबाद 334 धावांची खेळी केली होती. त्यानंतर वॉर्नरने हा पराक्रम केला आहे. सलामीवीर म्हणून त्रिशतक ठोकणारा तो ऑस्ट्रेलियाचा चौथा फलंदाज ठरला आहे. क्रिकेटच्या इतिहासातील हे चौथे वेगवान त्रिशतक ठरले आहे. सर्वांत वेगवान त्रिशतक ठोकण्याचा विक्रम भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्या नावावर आहे. 2007-08 साली चेन्नई येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना सेहवागने अवघ्या 278 चेंडूंमध्ये त्रिशतक झळकाविले होते.

वॉर्नर हा आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना पुण्यात 254 धावांची खेळी केली होती. वॉर्नरने आज

त्याला मागे टाकले.

कसोटी सामन्यात सलामीवीर म्हणून त्रिशतक ठोकणारा वॉर्नर हा जगातील 16वा आणि ऑस्ट्रेलियाचा चौथा सलामीवीर ठरला आहे, तर पाकिस्तानविरुद्ध त्रिशतक झळकावणारा चौथा फलंदाज ठरला आहे. ओव्हल मैदानावर सर्वाधिक धावा करण्याचा डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम वॉर्नरने मोडला आहे. ओव्हल मैदानावर ब्रॅडमन यांनी 299 धावांची खेळी केली होती.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply