उरण : रामप्रहर वृत्त
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागातर्फे घेण्यात आलेल्या उड्डाण महोत्सवात बाजी मारली आहे. या महाविद्यालयाने पथनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
मुंबईच्या सायन येथील गुरुनानक महाविद्यालयात झालेल्या पथनाट्य स्पर्धेत एकूण 22 महाविद्यालयांतील 400 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता, तसेच 35 विस्तारकार्य शिक्षक सहभागी होते. या स्पर्धेत कोकण ज्ञानपीठ उरण महाविद्यालयाने ‘यात माझी काय चूक’ या महिलांच्या मासिक पाळीबद्दल समज व गैरसमज विषयावर पथनाट्य सादर केले. यात प्रीतम घोष, भूमिका म्हात्रे, तेजश्री मोरे, सर्वांगी म्हात्रे, लतिका जोशी, श्वेता मसूरकर, भक्ती तेलंग, प्रतीक्षा जोशी, आवृत्ती पालकर, पौर्णिमा बुरुड, आरती खरोल व गौरव सरफरे हे विद्यार्थी सहभागी होते. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य के. ए. शामा, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे प्रमुख प्रा. व्ही. एस. इंदुलकर यांचे मार्गदर्शन लाभले.
क्षेत्र भेट कार्यक्रमास प्रतिसाद
उरण : कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचा क्षेत्र भेट कार्यक्रम नुकताच झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. बाळासाहेब पाटील होते. विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सकारात्मक जीवन कसे जगावे व जीवनातील ताण कसा कमी करावा याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य के. ए. शामा यांनी विद्यार्थीजीवनातच व्यक्तित्व विकास करून जीवनातील आव्हाने स्वीकारण्यास सक्षम बनावे, असे सांगितले.
या कार्यक्रमानिमित्त महिलांच्या मासिक पाळीबद्दल समज व गैरसमज या विषयावरील पथनाट्य सादर करून मासिक पाळीकडे पाहण्याचा समाजाचा द़ृष्टिकोन बदलणे कसा आवश्यक आहे, हा संदेश देण्यात आला. या वेळी संजय पन्ना, शिवानी जगताप, खान सदा व शिफा शेख या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर संशोधन पेपर सादर केले. प्रा. व्ही. एस. इंदुलकर यांनी आजीवन अध्ययन व विस्तार विभागाची भूमिका स्पष्ट केली. या कार्यक्रमास प्रा. एच. के. जगताप, प्रा. डॉ. पराग करुळकर, प्रा. आनंद गायकवाड, प्रा. डॉ. अरुण चव्हाण, प्रा. रामकृष्ण ठवरे, प्रा. अनुपमा कांबळे, प्रा. डॉ. दत्ता हिंगमिरे, तसेच विद्यार्थी उपस्थित होते.