Monday , February 6 2023

हे तर पळ काढण्यासाठी बळ वापरणारेे सरकार; भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांचा ‘मविआ’वर हल्लाबोल

अलिबाग : प्रतिनिधी

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांच्या दौर्‍यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमुळे कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडेल या भीतीपोटी सोमय्या यांनाच चार भिंतीआड दडवून संकटापासून वाचविण्याची ठाकरे सरकारची युक्ती म्हणजे पळपुटेपणाची परंपरा पुढे चालू ठेवण्याचाच प्रकार आहे. अशा भ्याडपणामुळे राज्यातील भ्रष्टाचारास पाठबळ मिळत आहे, अशी टीका भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी केली. भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या यांच्या भ्रष्टाचाराविरोधी मोहिमेत संपूर्ण पक्ष त्यांच्यासोबत असून ही लढाई निर्णायक शेवटापर्यंत लढली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालून तो उघडकीस आणणार्‍यावरच कारवाई करण्याच्या तालिबानी धोरणामुळेच ठाकरे सरकार सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे. केवळ दडपशाही करून अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न आता सुरू आहे, असेही ते म्हणाले. कोरोनाच्या संकटास तोंड देण्याऐवजी ठाकरे सरकारने जनतेस घरात बसायवास भाग पाडले. त्यामुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला. शाळांना कुलुपे लावून विद्यार्थ्यांना घरात बंद केले, त्यामुळे शिक्षणाचा बोजवारा उडाला. आता कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढण्यासाठी नाकर्ते ठाकरे सरकार सरसावले आहे, हेच सोमय्या यांच्यावरील कारवाईवरून स्पष्ट दिसत आहे, असे अ‍ॅड. मोहिते म्हणाले.  या पळपुट्या सरकारमुळे राज्यात आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली असून अपयश झाकण्याकरिता दडपशाही करणार्‍या ठाकरे सरकारने स्वतःच्याच कारभारावर प्रश्नचिन्हे निर्माण केली आहेत. धोरण आणि निर्णयाची कोणतीही क्षमता नसल्यामुळेच कोणत्याही प्रश्नावर भूमिका न घेता, प्रश्नच दडपण्याच्या धोरणामुळे ठाकरे सरकारने राज्याच्या जनतेस असुरक्षिततेच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले असून गुन्हेगारांना मात्र मोकाट सोडले आहे, असा आरोपही मोहितेंनी केला. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना खंडणीप्रकरणी कारवाईचा ससेमिरा चुकविण्यासाठी लपूनछपून वावरावे लागत असून या प्रकरणी पोलिसांचा वापर केल्याच्या आरोपामुळे पोलीस दल बदनाम झाले आहे. देशाच्या सुरक्षिततेला आव्हान असलेल्या अतिरेकी कारवायांचे धागेदोरे मुंबईपर्यंत पोहचल्याचे स्पष्ट होत असताना राज्याचे पोलीस दल मात्र सोमैय्या यांच्यावरील अनैतिक कारवाईसाठी बळ वाया घालवत आहे. राज्यात महिलांवर अत्याचार वाढत असून संजय राठोड नावाच्या मंत्र्यामुळे सरकारची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. अनिल परब यांच्या भ्रष्टाचाराच्या कहाण्यांमुळे सरकारच्या प्रतिमेचे वाभाडे निघत असताना त्यांनाही पाठीशी घालण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. हसन मुश्रीफ यांच्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे उघडी पडली आहेत आणि सरकारमधील अनेक मंत्र्यांवर आरोप होत आहेत. यामुळे अस्वस्थ असलेले पक्षाचे कार्यकर्ते सरकारी पाठबळावर पोलिसांदेखत हाणामार्‍या करीत असून कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडवत असताना पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत. अशा घटना रोखण्याऐवजी ज्यांना त्यापासून धोका आहे त्यांनाच ताब्यात घेऊन असे प्रकार रोखण्याची हिंमत नसल्याचीच कबुली ठाकरे सरकार देत आहे, असा आरोपही अ‍ॅड. महेश मोहिते यांनी केला. सुडबुद्धीने कारवाया करून ठाकरे सरकारने राज्यात आणीबाणीहूनही भयानक अशी तालिबानी राजवट सुरू केली असून जनतेच्या मनात संताप खदखदत आहे. सरकारने वेळीच जागे व्हावे आणि गुन्हेगारांना पाठीशी घालण्याऐवजी सत्याला सामोरे जाऊन कारवाईची हिंमत दाखवावी, असेही ते म्हणाले.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply