Breaking News

जनतेचा लोकसेवक

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा समाजसेवेचा वसा समर्थपणे चालवत समाजाला आवश्यक सेवा देण्याचे काम भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष तरुण तडफदार, अभ्यासू, लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून सातत्याने होत आहे. सामान्य कार्यकर्ता ते भाजप जिल्हाध्यक्ष, आमदार, सिडको अध्यक्ष यांसह अनेक सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांतील पदे भूषविली असली तरी ’कितीही मोठा झालो तरी मी सामान्य कार्यकर्ता आहे’ हीच समाजहिताची भूमिका त्यांनी जोपासली. त्यामुळे खर्‍या अर्थाने कर्तृत्वाने ते मोठे झाले. त्यामुळे ’मूर्ती लहान पण कीर्ती महान’ अशी टॅगलाइन त्यांच्या नावाला लागली आहे.

अवघ्या कोकणचे समर्थ नेतृत्व असलेल्या आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोकणचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेलला विकासाचे मॉडेल बनविण्याचे त्यांचे स्वप्न सत्यात उतरविले आहे. हेच त्यांच्या लोकप्रियतेचे प्रमुख कारण आहे. राजकीय कार्यकर्त्याच्या डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि पायाला भिंगरी हवी असे अपेक्षित असते. याचे मूर्तिमंत उदाहरण आमदार प्रशांत ठाकूर हे आहेत. त्यांचा राजकीय प्रवास प्रेरणादायी आहे. सत्तेत असो व नसो जनतेसाठी सतत काम करायचेच आणि हाच त्यांचा पिंड त्यांना विधायक कार्य करण्याची ऊर्जा देतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, युवकांच्या हातात देश द्यायचा आहे. त्यासाठी सक्षम युवा नेतृत्व कसे असावे याचे उदाहरण द्यायचे असेल, तर ते आमदार प्रशांत ठाकूर आहेत. आरोग्य शिबिर, रोजगार मेळावे अशा उपक्रमांतून लोकसंग्रह करीत सामान्य कार्यकर्ता ते नगराध्यक्ष, पुढे हॅट्ट्रिक आमदार असा प्रवास करणारे कोकणातील युवकांचे आदर्श असणारे म्हणून त्यांची ख्याती असून, जिल्ह्याला सांभाळण्याचे काम ते त्यांच्या कर्तृत्वशैलीने पार पाडतात. अनेक ज्येष्ठ नेत्यांचा आशीर्वाद आणि शिकवण लाभल्यामुळे ते नेहमी जोशामध्ये घाईघाईने कोणताही निर्णय न घेता जे काम करायचे ते उत्कृष्ट करायचे असा त्यांचा सदैव ध्यास दिसतो. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळामार्फत राबविले जाणारे अनेक उपक्रम आणि त्यांचे नियोजन पाहिले असता त्या उपक्रमामागील असणारी त्यांची तळमळ दिसून येते. सकाळी लवकर उठून घरी आलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या निकाली काढणे, त्यानंतर दिवसभर पायाला भिंगरी लावून सतत वेगवेगळे विषय हाताळणे हे त्यांच्या अंगवळणीच पडले आहे, असे म्हणावे लागेल. सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, आरोग्य, राजकीय अशा अनेक क्षेत्रांत आमदार प्रशांत ठाकूर यांचे कार्य नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. आजपर्यंत त्यांनी केलेली कामे समाजात आदर्श निर्माण करणारी आहेत. लोकांना सन्मार्ग दाखविण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. त्यामुळे या तरुण नेतृत्वाकडून अभ्यासू असण्याची सर्वांनाच अपेक्षा असते. या अपेक्षेला आमदार प्रशांत ठाकूर पुरून उरतात. त्यांच्या सभागृहातील आणि सभागृहाबाहेरील भाषणांतून याची प्रचिती येते. विषयाच्या मुळाशी जाण्याची त्यांची वृत्ती सर्वांना मोहात टाकणारी ठरते. पायाभूत सुविधा देण्याबरोबरच आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक सेवा करण्याचे  काम त्यांच्याकडून होत आहे. राजकीय नेते शक्यतो कला, साहित्य, क्रीडा या प्रांतापासून चार हात लांब असतात, मात्र आमदार प्रशांत ठाकूर याला अपवाद आहेत. राजकीय स्वार्थासाठी विविध स्पर्धा न भरविता प्रत्यक्ष बारीकसारीक गोष्टीत लक्ष घालून उत्कृष्ट व्यासपीठ निर्माण करीत ते पनवेल आणि रायगडमधील कलावंत आणि खेळाडू तसेच साहित्यिकांना प्रोत्साहन देत असतात. स्वतः नवनवीन पुस्तकांचे वाचन करताना ते नेहमी आढळतात. कलेला राजाश्रय मिळाल्यामुळेच रायगडमधील कलावंत उच्च यश संपादन करताना दिसत आहेत. आपल्या धावपळीच्या जीवनात असे कार्यक्रम त्यांना आत्मिक आनंद देत असल्याची कबुली ते नेहमीच देतात. पनवेलला विकासात बदलण्याचे आणि वेळोवेळी संकटकालीन परिस्थितीत लोकांना मदतीचा हात देण्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नाही. दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने आरोग्य महाशिबिर आयोजित करून रुग्णांची सेवा केली जाते, पण यंदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता हे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले नसले तरी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या आमदार निधीतून 50 लाख रुपयांचा निधी दिला आहे.

कोरोना व्हायरस आणि त्यामुळे आलेल्या लॉकडाऊन परिस्थितीत गरीब नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी दानशूर नेते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल आणि भाजपच्या वतीने ’मोदी भोजन’ कम्युनिटी किचन अर्थात मोफत अन्नछत्र उपलब्ध करून देण्यात आले. त्यामार्फत एक लाख 25 हजारांहून अधिक नागरिकांना भोजन देण्यात आले. त्याचबरोबर 90 हजारांहून अधिक नागरिकांना कोरडा शिधा देऊन कोरोनाच्या संकटकाळात आधार देण्यात आला. एक लाखांहून अधिक नागरिकांना मास्क व रोगप्रतिकारशक्ती वाढविणार्‍या गोळ्या देण्यात आल्या. या काळात रक्ताचा तुटवडा पाहता तो भरून काढण्यासाठी त्यांच्या प्रेरणेने रक्तदान शिबिर आयोजित करून रक्ताचा तुडवडा भरून काढण्यात आला. पूर असो किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती लोकांना मदत करण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने केले जात आहे. कोरोना व लॉकडाऊनमध्ये नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते, पण आमदार प्रशांत ठाकूर यांनी लोकांना दिलासा देण्याचे काम सातत्याने केले व करीत आहेत.

या काळात आलेल्या वाढीव वीज बिलांसंदर्भात सर्वसामान्य वीज ग्राहकांचा आवाज त्यांनी बुलंद केला. रायगडातील विविध उद्योगांतील कंत्राटी व कायमस्वरूपी कामगारांच्या कोरोना उपचाराचा खर्च संबंधित कंपनीने करावा, कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन उपाययोजना करावी, पनवेल व उरण तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी सिडकोच्या माध्यमातून तातडीने किमान 1000 बेड्सचे सुसज्ज रुग्णालय उपलब्ध करून देण्यात यावे, अशा मागण्या शासनाकडे करतानाच कोरोनाग्रस्त रुग्णांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधत रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. सतत समाजाच्या विकासाचा ध्यास घेऊन समाजाला कशाची गरज आहे हे लक्षात घेऊन आमदार प्रशांत ठाकूर ऊन-पावसाची तमा न बाळगता दिवसाचे 18-18 तास काम करीत आहेत. त्यांच्या या लोकसेवेला तमाम जनतेच्या वतीने सलाम!

-हरेश साठे, पनवेल

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply