Breaking News

गुड न्यूज आहे पण…

महाराष्ट्रात बुधवारपासून अनलॉक 3च्या नव्या नियमावलीनुसार बर्‍याच गोष्टी चार महिन्यांनंतर प्रथमच खुल्या होणार आहेत. गेल्या आठवड्यापासून राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी काहिशी स्थिरावल्यासारखी भासत आहे, पण अद्याप चार-दोन दिवसच झाल्यामुळे लगेच काही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. मॉल, दुकाने उघडल्यामुळे जनजीवन पूर्ववत झाल्यासारखे भासून अनेकांना हायसे वाटणार आहे. ही गुड न्यूज आहे खरी, पण हा आनंद दीर्घकाळ टिकवायचा असेल तर दक्षता घेतच पुढे जावे लागणार आहे.

अनलॉक 3चा भाग म्हणून महाराष्ट्रातील मॉल, अत्यावश्यक श्रेणीत न मोडणारी सर्व दुकाने 5 ऑगस्टपासून उघडतील असे राज्य सरकारने जाहीर केल्यापासून अनेकांचे डोळे या तारखेकडे लागले होते. मॉल तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंची दुकाने बुधवारपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत खुली राहणार असल्यामुळे गजबज वाढेल आणि जनजीवन पूर्ववत झाल्यासारखा आभास नक्कीच निर्माण होईल. अनेकांच्या उपजीविका मॉल व दुकानांमधून होणार्‍या विक्री व्यवहारावर अवलंबून असल्यामुळे हे पाऊल अत्यावश्यकच होते. विक्री नाही तर उत्पादन करून काय उपयोग, त्यामुळे बर्‍याच उत्पादन उलाढाली गेले चार महिने जवळपास ठप्प होत्या. लाखो लोकांच्या उपजीविका त्यामुळे संकटात सापडल्या होत्या. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या काही केल्या कमी होत नव्हती. त्यामुळे राज्यातील अनेक महापालिका क्षेत्रांमध्ये जुलैच्या प्रारंभीच्या काळात नव्याने लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. मिशन बिगिन अगेन म्हणायचे आणि पुन्हा लॉकडाऊन लादायचा या राज्य सरकारच्या धरसोड कारभारामुळे लोक प्रचंड हबकले होते. कोरोनाची भीती होतीच, पण अनेकांना आता उपासमारीने मरण्याची वेळ येणार की काय, अशी चिंता ग्रासू लागली. अखेर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या काहिशी स्थिरावल्यासारखी भासू लागली आणि सरकारने बरेच आर्थिक व्यवहार सुरू करण्यासाठी 5 तारीख निश्चित केली. अर्थात रुग्णसंख्या स्थिरावल्यासारखी भासल्याला फार दिवस झालेले नाहीत. इतक्या अल्प दिवसांमध्ये आपल्याकडची महामारी आटोक्यात आली वगैरे निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. राजधानी नवी दिल्लीत गेला महिनाभर सातत्याने कोरोनाच्या केसेस कमी होताना दिसत आहेत. तिथे रोजच्या रोज मोठ्या संख्येने लोक बरे होत आहेत व तुलनेने नव्या केसेसची संख्या बरीच कमी आहे. आपल्याकडेही किमान तेवढा काळ रुग्णसंख्या आटोक्यात राहिलेली दिसायला हवी, अन्यथा प्रशासकीय यंत्रणेकडून रुग्णांच्या आकड्यांचा खेळ कसा खेळला जातो हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. त्यामुळे अशा आकडेवारीच्या खेळाला न भुलता जनतेने कोरोना महामारीच्या संदर्भातील सर्व दक्षता घेतच पुढे जायचे आहे. महाराष्ट्रातील कोरोना विषाणूचे रूप देशाच्या अन्य भागांतील कोरोनापेक्षा काहिसे वेगळे असल्याचेही गेल्याच आठवड्यात समोर आले आहे. राज्यात पुणे, नाशिक, सातारा आदी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या नोंदींनुसार महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे रूप काहिसे पालटल्यासारखे दिसत आहे. आपल्या देशातील कोरोना विषाणू हा प्रामुख्याने युरोपातून आलेल्या भारतीय प्रवाशांसोबत आला होता. महाराष्ट्रातील जवळपास 50 टक्के रुग्णांमध्ये आता त्याचे रूप काहिसे बदलल्यासारखे दिसत आहे. अर्थात त्याविषयी आणखी माहिती पुढे यायला हवी. आता राज्याच्या ग्रामीण भागांत कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्यामुळे व्यवहार खुले करतानाच दक्षता बाळगण्याची जबाबदारी निभवावीच लागेल.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply