
नवी मुंबई : बातमीदार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे श्रीराम जन्मस्थानी भव्य मंदिराचा पायाभरणी समारंभ बुधवारी झाला. अयोध्येत राम जन्मस्थानी मंदिर व्हावे, या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार म्हणून बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या गौरव निवासस्थानी प्रभू श्री रामचंद्र यांच्या पूजेचे आयोजन करण्यात आले होते.
तो ऐतिहासिक क्षण घरावर रोषणाई करून घरासमोर पणत्या लाऊन रांगोळी काढून दिवाळी दसरा सारखा भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला. या वेळी श्री रामाची मनोभावे विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. आमदार म्हात्रे यांनी सांगितले की, एक प्रदीर्घ लढा सफल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी, स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सारख्या अनेक नेत्यांचे या लढ्यात मोठे योगदान आहे. राम मंदिर आंदोलनात अनेक कार्यकर्ते सक्रीय सहभागी झाले. अनेक वर्षापासुनचे आपले स्वप्न आज पूर्ण होत असून कोरोनाचे सावट असले तरी संपूर्ण भारतातच नव्हे तर परदेशातही आजचा दिवस हा दिवाळी सारखा सण म्हणून साजरा केला गेला.
तसेच आम्ही भारतीय स्वतःला नशीबवान समजतो की, प्रभू श्री रामाचा जन्म आमच्या भारत देशात झाला आहे. जणूकाही आजच श्रीरामाचा जन्म झालाय आणि याचा आनंद द्विगुणीत व्हावा इतका आनंद संपूर्ण भारतीयांना झाला असून आमच्या देशाची अखंडता, आपली संस्कृती, आपले संस्कार हे सर्व सांभाळून सोशल डिस्टन्सिंग पाळून सर्व भारतीय घरोघरी पारंपारिक दिवे, पणत्या लावून आजचा हा सण साजरा करीत आहोत.