Breaking News

तळोजात स्लॅब कोसळून अग्निशमन कर्मचारी जखमी

इमारतींची दूरवस्था; रहिवासी त्रस्त

पनवेल : प्रतिनिधी – तळोजा एमआयडीसीतील अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांसाठी उभारलेल्या वसाहतीमधील इमारतींची दूरवस्था झाली असून, स्लॅब कोसळून मंगळवारी (दि. 30) एक कर्मचारी जखमी झाला. सुदैवाने अनर्थ टळला.

तळोजा एमआयडीसीतील अग्निशमन केंद्राजवळ येथील कर्मचार्‍यांसाठी छोटी वसाहत उभारण्यात आली आहे. सध्या 17 कुटुंब तेथे राहत आहेत. मंगळवारी महेंद्र सुतार हे राहत असलेल्या फ्लॅटमधील स्लॅब कोसळला. आपल्या अडीच वर्षांच्या मुलाच्या अंगावर स्लॅब कोसळणार असल्याचे लक्षात आल्यावर ताबडतोब त्यांनी त्याला बाजूला केले. या वेळी सुतार यांना थोडी जखम झाली. येथील सर्व फ्लॅटमधील स्लॅब कधीही कोसळून पडू शकतील, अशी अवस्था असल्याने तेथे राहणार्‍या कुटुंबांना जीव मुठीत घेऊन रहावे लागत आहे. येथील फायर ऑफिसर दीपक दोरूगडे यांच्या म्हणण्यानुसार इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून व इमारत जमीनदोस्त करून नवीन इमारत बांधण्याची आवश्यकता आहे. याबाबत वरिष्ठ स्तरावर माहिती देण्यात आली आहे.

संबंधित इमारतीच्या देखभालीची जबाबदारी एमआयडीसीकडे आहे. तळोजा एमआयडीसी कार्यालयातील उपअभियंता दीपक बोबडे पाटील यांना याबाबत विचारले असता, उद्यापासून खराब स्लॅब तोडण्यात येणार आहे, परंतु दुरुस्तीचे काम निविदा काढून मंजुरी मिळेपर्यंत करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. गेल्या पाच-सहा वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकाराला तेथे राहणारे लोक कंटाळले असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply