Breaking News

50 मुस्लीम कुटुंबांनी स्वीकारला हिंदू धर्म

राम मंदिर भूमिपूजनाचे औचित्य

जयपूर : वृत्तसंस्था
अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा बुधवारी (दि. 5) झाला. याचदरम्यान राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील पायला कल्ला पंचायत समितीच्या मोतीसरा गावात राहणार्‍या 50 मुस्लीम कुटुंबीयांनी हिंदू धर्म स्वीकारला. हिंदू धर्म स्वीकारणार्‍या कुटुंबातील वयस्कर लोकांचे म्हणणे आहे की, त्यांचे पूर्वज हिंदू होते. इतिहासाचे ज्ञान असल्यामुळे त्यांनी कोणत्याही दबावाशिवाय स्वेच्छेने हिंदू धर्म स्वीकारला आहे.
हिंदू धर्माचे स्वीकार करणारे सुभनराम यांनी सांगितले की, मुघल काळात त्यांच्या पूर्वजांना धमकावून मुस्लीम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले होते. याबाबत कळल्यानंतर आम्ही हिंदू आहोत आणि आम्हाला पुन्हा याच धर्मात जायचे असे ठरवले. आमच्या प्रथा संपूर्ण हिंदू धर्माशी संबंधित आहेत. त्यामुळे सर्वांनी मिळून हिंदू धर्मात परत जाण्याची एकमुखी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर 50 मुस्लीम कुटुंबांतील 250 सदस्यांनी होम-हवन करून हिंदू धर्माचा स्वीकार केला.
गावातील हरजीराम यांच्या म्हणण्यानुसार, कांचन ढाढी जातीची ही कुटुंब बर्‍याच वर्षांपासून हिंदू प्रथा-परंपरा पाळत होते. दरवर्षी ते आपल्या घरात हिंदू सण साजरे करतात. याच कुटुंबीयांतील विंजारम यांनी सांगितले की, मुस्लीम रीतीरिवाजांनुसार आम्ही कोणतेही धार्मिक कार्य केले नाही. रामजन्मभूमी येथे राम मंदिराच्या भूमिपूजनावेळी आम्ही सर्वांनी होम-हवनचा कार्यक्रम आयोजित केला आणि हिंदू संस्कृतीचा पाठपुरावा करून स्वेच्छेने हिंदू धर्मात परतलो. यासाठी कोणाचाही दबाव नाही.
राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर या कुटुंबीयांनी गावच्या सरपंचांना बोलावून हवन केले. विशेष म्हणजे मुस्लीम असूनही या कुटुंबांतील सर्वांची नावे हिंदू धर्मानुसार आहेत. विंजाराम यांनी सांगितले की, त्या वेळी त्यांच्या पूर्वजांना जबरदस्ती मुस्लीम धर्माचा स्वीकार करण्यास भाग पाडले होते, परंतु आता घरातील शिक्षित पिढीने हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे तसेच हा निर्णय कोणाच्याही दबावाखाली येऊन घेतला नसल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
ऐतिहासिक क्षणाने सर्वांना आनंद
हिंदू धर्म स्वीकारलेल्या एका कुटुंबातील सदस्य हरुराम यांनी सांगितले की, सध्या जगावर कोरोनाचे मोठे संकट आहेत. अशात राम मंदिराचे भूमिपूजन झाले आणि या ऐतिहासिक क्षणाने सर्वांना आनंद दिला. आम्हीही घरात दिवे लावून, होम-हवन करून हा दिवस साजरा केला, तर गावचे सरपंच प्रभूराम कलबी म्हणाले की, या सर्वांनी स्वत: हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. भारतीय संविधानानुसार कोणतीही व्यक्ती कोणताही धर्म स्वीकारू शकते.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply