Breaking News

आगरदांडा जेट्टी मच्छीमारांना उपलब्ध करून द्या

अन्यथा आंदोलनाचा इशारा

मुरूड : प्रतिनिधी – मुंबई येथील मासळीचे मुख्य मार्केट बंद असल्याने राजपुरी, दिघी, मुरूड व एकदरा  येथील मच्छीमारांना मासळी विकता येत नाही. त्यामुळे पकडलेली मासळी फुकट जात आहे. आगरदांडा येथील जेट्टी मुंबईपासून जवळ असल्याने व मोठ्या बोटींना सोयीस्कर असा धक्का असल्याने मुंबईचे बाजार सुरू होईपर्यंत किमान दोन महिन्यांसाठी आगरदांडा जेट्टी मच्छीमारांना उपलब्ध करून द्यावी. या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करू, असा इशारा मुरूड तालुका नाखवा संघाचे प्रमुख समन्वयक प्रकाश सरपाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला.

सरपाटील म्हणाले की, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडे सहापेक्षा जास्त जेट्ट्या आहेत.आगरदांडा येथे तीन जेट्ट्या असून, त्यातील कोणतीही एक जेट्टी मच्छीमारांना दिल्यास आमचे काम सुकर होईल. मुंबईचे व्यापारी आगरदांडा येथे येण्यास तयार आहेत, परंतु बोटी बंदराला लावून न दिल्यामुळे आमचा माल फुकट जात आहे. व्यापारी आले तर रोख स्वरूपात व्यवहार होऊन क्रयशक्ती वाढणार आहे. त्यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल.

एकदरा, राजपुरी, दिघी व मुरूड परिसरातील सुमारे दोनशे होड्या मोठ्या प्रमाणात मासळी घेऊन आल्याने महिन्याला सुमारे 25 कोटी रुपयांची उलाढाल होणार असल्याचा दावा या वेळी सरपाटील यांनी केला.

आगरदांडा जेट्टी प्रशासनाने आम्हाला लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी. मासळीचे नुकसान होत असल्याने मच्छीमार बांधव आता शांत बसणार नाहीत. रागाच्या भरात मालमत्तेचे नुकसान झाल्यास नाखवा संघ जबाबदार राहणार नाही, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

जय भवानी मच्छीमार सोसायटीचे चेअरमन महेंद्र गार्डी, माहेश्वरी मच्छीमार सोसायटीचे चेअरमन धू्रव लोदी, दामोदर बैले, सागरकन्या मच्छीमार संघाचे संचालक भालचंद्र गार्डी हेही पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply