Breaking News

जागरूक तरुणामुळे वाचले; एमएसईबीचे ट्रान्समिशन कार्यालय

नवी मुंबई : बातमीदार

नेरूळ येथील सोमनाथ म्हात्रे या कर्तव्यदक्ष तरुणामुळे मोठ्या आगीची हानी टळली आहे. जिमखान्यासमोर असलेल्या एमएसईबीच्या ट्रान्समिशन कार्यालयाशेजारी असलेल्या सुक्या पालापाचोळ्याला अज्ञात इसमाने आग लावली. ही आग पसरत जाऊन आजूबाजूला पसरली. या भागाला खेटूनच   एमएसईबीच्या कार्यालय असल्याने मोठा पेचप्रसंग उभा राहिला होता, परंतु म्हात्रे यांनी तातडीने अग्निशमन दलाला बोलावल्याने वेळीच आग विझवण्यात आली.

नेरूळ जिमखान्यासमोर रेल्वे ट्रॅक असल्याने हिरवी झाडी आहे. कडक उन्हाळ्यात ही झाडी सुकली आहे. ट्रॅकच्या बाजूला एमएसईबीचे कार्यालय व ट्रान्समिशन; तर शेजारीच विठ्ठल-रखुमाई मंदिर आहे. अज्ञात इसमाने येथील सुक्या पालापाचोळ्यास आग लावून तो नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय यातून दिसून येतो, मात्र ही आग कडक उन्ह व वार्‍यामुळे वेगात पसरत जाऊन आगीने मोठा पेट घेतला. त्यामुळे एमएसईबीच्या ट्रान्समिशनला याचा धोका उदभवण्याची शक्यता होती.

या भागातून आपल्या नोकरीवर जाणार्‍या नेरूळ गावातील तरुण सोमनाथ म्हात्रे याने ही घटना पाहताच अग्निशमन दलाला फोन केला. अग्निशमन दलाने वेळ न दवडता लागलीच येऊन ही आग विझवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. अन्यथा या भागात असलेल्या झोपडपट्टीलादेखील आग लागण्याची शक्यता होती. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता होती. दरम्यान, एमएसईबीचे येथे ट्रान्समिशन असलेल्या या लहानशा कार्यालयात कोणीही उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

  • नागरी सजगता महत्त्वाची

सुक्या पालापाचोळ्याला आगी लावण्याच्या प्रकारावर सजग नागरिकांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. अनेकजण सुक्या पालापाचोळ्यास गंमत किंवा तो भूभाग स्वच्छ करण्यासाठी आग लावतात, मात्र आधीच प्रखर उन्हामुळे व वार्‍यामुळे ही आग पसरत जाते. आग पसरत जाऊन अनेक आगीच्या घटना घडलेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे वातावरणदेखील दूषित होते. याबाबत पालिकेकडून जनजागृती होणे गरजेचे असले तरी नागरिकांनीही अशा बाबतीत सजग राहणे गरजेचे आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply