Breaking News

फुसका बार

शहरी भाग असो की ग्रामीण, गरिबीत खितपत पडलेल्यांचे दर्शन आजही अगदी सहजच घडते, पण हा राजबिंडा राजपुत्र अवघी पाच वर्षे देशाची जबाबदारी सांभाळणार्‍या मोदींच्या माथ्यावर या सार्‍याचे खापर फोडून मोकळा होतो आणि पुन्हा सत्तेवर आल्यास गरिबांना किमान उत्पन्न उपलब्ध करून देण्याचे गाजर दाखवतो. आपली घोषणा हा एक धमाका आहे. आजवर जगाच्या इतिहासात कुठल्याही देशाने असे काही केलेले नाही.

निवडणुकीची रणधुमाळी म्हटले की घोषणा, आश्वासनांचा पाऊस पडायचाच. अर्थात जगातील सर्वात मोठा लोकशाही देश गणल्या जाणार्‍या भारताने एव्हाना असे कित्येक पावसाळे पाहिले आहेत म्हणायला हरकत नसावी. त्यामुळेच इथला मतदारराजा एव्हाना चांगलाच प्रगल्भ झाला असून कुठल्या भूलथापांना बळी पडायचे नाही हे तो नीट जाणतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची 60 वर्षे देशावर राज्य केल्यानंतर आता अचानक नव्याने देशातील गरिबीचा साक्षात्कार होऊन तिच्यावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याची घोषणा काँग्रेस पक्षाच्या खळीदार हसणार्‍या राजपुत्राने सोमवारी केली. आपली ही घोषणा म्हणजे ‘धमाका’ असल्याचा दावाही त्याने केला, परंतु देशातील गोरगरीब जनतेने असे अनेक फुसके बार त्यांच्या पक्षाच्या प्रदीर्घ राजवटीत पाहिलेले आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी ‘गरिबी हटाव’चा नारा देण्याची तर त्या पक्षाची उज्ज्वल परंपराच आहे. राहुल गांधी यांची आजी इंदिरा गांधी यांनी ऐंशीच्या दशकात ‘गरिबी हटाव’चा नारा देऊन देशातील भोळ्याभाबड्या, गोरगरीब जनतेला भुरळ घातली होती. अर्थात, पुढे त्यातून देशातील गरिबीचे कितपत उच्चाटन झाले याकरिता कुठल्याही किचकट आकडेवारीची गुंतागुंत उलगडण्याची गरज नाही. आपल्या या योजनेमुळे देशात एकही गरीब व्यक्ती राहणार नाही, असे बरेच काही त्यांच्या बालसुलभ मनाला वाटते, परंतु 60 वर्षांच्या प्रदीर्घ सत्ता कालखंडात त्यांच्या पक्षाला असे काही करणे का बरे जमले नाही, अशा जटील प्रश्नांचा विचार काही तो करत नाही. त्यामुळे त्याविषयी अवाक्षरही न उच्चारता, मोदींनी काळा पैसा असणार्‍यांना मदत केल्याची गरळ ओकली जाते, परंतु अशा बिनबुडाच्या आरोपांना जनता भीक घालत नाही. काँग्रेस म्हणजे काळा पैसा हे समीकरण अद्याप जनतेच्या किंचितही विस्मरणात गेलेले नाही याचे भान बहुदा त्यांना नसावे. त्यांच्या या योजनेचे तपशील पाहिले असता काय दिसते, तर देशातील सर्वाधिक गरीब अशा 20 टक्के कुटुंबांना वर्षाला प्रत्येकी 72 हजार रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. या योजनेतून सुरुवातीला पाच कोटी जनतेला दारिद्य्रातून बाहेर काढले जाईल व पुढे एकंदर 25 कोटी जनतेची गरिबीतून मुक्तता होईल आदी तपशील त्यांनी जाहीर केले आहेत. टप्प्याटप्प्याने ही योजना जाहीर करणार्‍या काँग्रेस पक्षाने गेल्या दोन-तीन महिन्यांत तीत अनेक बदल केले आहेत. सहा महिने या योजनेवर विचारविनिमय सुरू होता अशी बढाई मारणार्‍या राहुल गांधी यांना, त्यांच्या पक्षाने 60 वर्षे केले काय याचा जाब विचारल्याशिवाय जनता राहणार नाही. आपण अर्थतज्ज्ञांच्या मदतीने ही योजना आखल्याचे लाख दावे त्यांनी केले, तरी या योजनेच्या व्यवहार्यतेविषयी तज्ज्ञ शंका उपस्थित करीत आहेत. वर्षानुवर्षे देशाला लुबाडून निव्वळ स्वत:चे उखळ पांढरे करणार्‍या पक्षाच्या आश्वासनांना बळी पडण्याइतकी जनता आता खुळी राहिलेली नाही.

Check Also

सदस्य नोंदणीत प्रत्येकाने सहभाग घ्यावा -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनतेच्या साक्षीने राज्यात आपल्याला अभूतपूर्व असे यश मिळाले आहे. आता पक्षवाढीसाठी …

Leave a Reply