नवी दिल्ली : वृत्तसंस्था
यंदाच्या आयपीएलमधील पहिला सामना जिंकून किंग इलेव्हन पंजाब संघाने विजयी सुरुवात केली आहे, मात्र राजस्थान फलंदाज जोस बटलरला ज्या पद्धतीने बाद केले त्यानंतर अश्विन दिग्गजांच्या टिकेचा धनी बनला आहे. बटलरला बाद केल्यानंतर अश्विनच्या अखिलाडू वृत्तीवर अनेक दिग्गजांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विन गोलंदाजी करीत असताना त्याने चेंडू टाकण्याआधी नॉन-स्ट्राईककडील यष्ट्यांवरील बेल्स उडवल्या. त्या वेळी बटलर धाव घेण्यासाठी क्रीजबाहेर निघाला होता. पंचांनी हा निर्णय तिसर्या पंचांकडे सोपवला. तिसर्या पंचांनी मंकड नियमाप्रमाणे बटलरला बाद ठरवले. यामुळे आयपीएलला वादाचे गालबोट लागले.
अश्विनच्या या कृत्यावर जेसन रॉय, मोहम्मद कैफ, डेल स्टेन आणि आकाश चोप्रासारख्या दिग्गजांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अश्विनवर सोशल मीडियावरही लोकांनी नाराजी व्यक्त केली. बटलरबाबत पंच निर्णय देणार होते. त्यामुळे अश्विनने बटलरला इशारे करायची गरज नव्हती. अश्विनने खिलाडूवृत्ती दाखविली नाही, असे म्हणत नाराज नेटीझन्सनी अश्विनवर टीकेची झोड उठवली आहे.