पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सोमवारी (दि. 10) होणारी सभा प्रशासनाच्या अपारदर्शक कारभारामुळे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या मागणीनुसार तहकूब केली. प्रशासनाकडून माहिती दिली जाईपर्यंत सभा तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे व अन्य विषयांवर चर्चा करण्यासाठी पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सकाळी 11 वाजता बोलवण्यात आली होती. सभेपुढे विषय पत्रिकेवर 39 विषय चर्चेला होते. महापालिकेने कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी खरेदी केलेल्या हॅण्ड ग्लोव्हज (नग 50 हजार)वर झालेल्या खर्चास व दरास मान्यता देण्याचा पहिलाच विषय चर्चेला आला असता, मागील सभेत प्रशासनाने तातडीने खरेदी करताना त्याबाबत स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेत्यांना माहिती दिली जावी असे ठरले असताना ती दिली नसल्याचे लक्षात आले. त्यावर सदस्यांनी हरकत घेऊन सभा तहकूब करण्याची मागणी केली.
अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी प्रशासन हे स्थायी समितीला विश्वासात घेत नसल्याबद्दल सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन जोपर्यंत कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठीच्या खरेदीबाबत प्रशासनाकडून माहिती दिली जात नाही तोपर्यंत स्थायी समितीची सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला.
महापालिका प्रशासन कोरोना विषाणूच्या प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी करीत असलेल्या खर्चाला आमचा विरोध नाही, पण त्यांनी याबाबत माहिती देणे आवश्यक असताना ती दिली जात नाही. मागील सभेत तातडीची खरेदी करताना अध्यक्ष, सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेत्यांना माहिती देण्यात यावी असे ठरले होते. लोकांचा पैसा व्यवस्थित वापरला जात नसेल तर तो खर्च नाकारण्याचा स्थायी समितीला अधिकार आहे. म्हणून आजची सभा तहकूब करण्यात आली.
-परेश ठाकूर, सभागृह नेते
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना त्यासाठीच्या खर्चाची माहिती स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेत्यांना देण्याचे ठरले होते. मला त्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. हा जनतेचा पैसा असल्याने त्यामध्ये पारदर्शकता असायला हवी, कारण उद्या खर्चाला मान्यता दिली म्हणून स्थायी समितीला जबाबदार धरले जाणार आहे.
-प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्षनेते