उरण : प्रतिनिधी
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारडे मधील उपक्रमशील शिक्षक कौशिक ठाकूर त्यांच्या संकल्पनेतून व मुख्याध्यापिका ऊर्मिला म्हात्रे, समद्धी वर्हाड, सुनील नर्वे यांनी रायगड जिल्ह्यातील पहिल्या शालेय शैक्षणिक संग्रहालयाची निर्मिती केली आहे. जिल्हा परिषदेच्या सारडे शाळेत रायगड जिल्ह्यातील पहिल्या शालेय शैक्षणिक संग्रहालयाचे उद्घाटन उरणच्या गटशिक्षण अधिकारी दीपा परब यांच्या हस्ते करण्यात आले.
या नावीन्यपूर्ण संग्रहालयात तिसरी ते सातवीच्या पाठ्यपुस्तकातील अनेक संकल्पना व प्रयोग उपलब्ध साहित्याच्या आधारे आकर्षक व सुबक अशा पद्धतीने मांडणी करून ठेवण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना कठीण वाटणार्या संकल्पना सहज आणि सोप्या केल्या आहेत, प्रयोग साहित्य हाताळण्याची सवय लागते, विद्यार्थी स्वतः सहभागी असल्याने प्रयोग करण्याची भीती दूर होऊन त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो. यामध्ये परिसरातील सजीव, निर्जीव व त्यांची लक्षणे, त्यांचे प्राणी, उभयचर प्राणी, पृष्ठवंशी, अपृष्ठवंशी प्राणी, सस्तन व अंडज प्राणी व त्यांचा निवारा, सजीवांची साखळी, वनस्पतींचे अवयव व त्यांचे कार्य, पानाचे प्रकार, वनस्पतींच्या अवयवाचे भाग, मानवी शरीर संस्था, चित्ररूपात व प्रतिकृती रूपात पाहायला मिळेल, तसेच संपूर्ण शिवचरित्र व स्वराज्यातील महत्त्वाच्या किल्ल्यांची माहिती चित्ररूपात पाहायला मिळेल. आशाप्रकारचे संग्रहालय रायगड जिल्ह्यात सारडे शाळेने पहिल्यांदाच साकारल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदर कार्यक्रमाला केंद्रप्रमुख संगीता चंदने, सरपंच चंद्रशेखर पाटील, उपसरपंच शामकांत पाटील, चद्रकांत पाटील, दिनेश म्हात्रे, माजी सरपंच शशिकांत म्हात्रे, ग्रामसेवक पवित्र कडू, ध. प. पाटील, समीर पाटील, भार्गव म्हात्रे, भगवती पाटील, भारती पाटील, प्रगती पाटील, हिमाली म्हात्रे, कविता गावंड, पुष्पलता म्हात्रे, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.