Breaking News

गोपाळकाला आणि गणेश विसर्जन मिरवणूक रद्द; शांतता कमिटीच्या बैठकीत निर्णय

श्रीवर्धन ः प्रतिनिधी

श्रीवर्धन शांतता कमिटीची बैठक नुकतीच मध्यवर्ती प्रशासकीय भवन येथील सभागृहात पार पडली. ही बैठक श्रीवर्धन उपविभागीय पोलीस अधिकारी व तहसीलदारांनी आयोजित केली होती. बैठकीसाठी प्रत्येक गावातील गोविंदा मंडळाचे दोन सदस्य उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्यात आले होते. या बैठकीत गोविंदा आणि गणेश विसर्जन मिरवणूक न काढण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी जमू नये या हेतूने हा निर्णय घेण्यात आला.                   ज्या पाखाडीचा कृष्णजन्म नेहमी होतो त्याच ठिकाणी पाच-सहा जणांच्या उपस्थितीत उत्सव करण्यात यावा. तसेच गणेश विसर्जन करतानादेखील संपूर्ण गाव किंवा पाखाड्यांनी एकत्रितपणे विसर्जन करू नये. त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे. तसेच कमीत कमी गर्दी असावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थित सर्वांनी या निर्णयाला मान्यता दर्शविली. श्रीवर्धन शहरात प्रत्येक पाखाडीत गोविंदा पथक खालुबाजासह आपली मिरवणूक काढते. कृष्णजन्माच्या दिवशी सायंकाळपासून खालुबाजासह सुरू झालेली मिरवणूक गोपाळकाल्याच्या दिवशी सायंकाळी समाप्त करण्यात येते, परंतु या वर्षी गोविंदा निघणार नाही म्हणून अनेक तरुणांचा हिरमोड झाला आहे. तसेच गणेशोत्सव काळातदेखील बैठकीचा नाच किंवा भजनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करू नये किंवा सदरचे कार्यक्रम रद्द करावेत, असे प्रशासनाकडून सुचविण्यात आले आहे. या बैठकीसाठी श्रीवर्धनचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव पवार, पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, म्हसळा पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार तसेच श्रीवर्धनचे तहसीलदार सचिन गोसावी आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply