Breaking News

सिडकोकडील सेवा पनवेल मनपाकडे हस्तांतरीत करण्याच्या कामाला वेग

पनवेल : प्रतिनिधी

सिडकोकडील सेवा पनवेल महापालिकेकडे हस्तांतरणाच्या दृष्टीने सिडको अधिकार्‍यांबरोबर सेवा पाहणी महापालिका अधिकार्‍यांनी सुरू केली आहे. गुरुवारी (दि. 30) झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत आयुक्त गणेश देशमुख यांनी संबधित विभागाकडून या पाहणीचा आढावा घेतला. पनवेल महापालिका हद्दीत सिडको प्राधिकरणाच्या हस्तांतरण होणार्‍या सेवा-सुविधा पाहणी कार्यक्रम हाती 27 सप्टेंबरपासून घेतला आहे. यामध्ये रस्ते, फूटपाथ, मलनिस्सारण वाहिनी, एसटीपी प्लॅन्ट, इलेक्ट्रिकल व एचटी कनेक्शन्स, पथदिवे, उद्याने, खेळाची मैदाने, ट्री बेल्ट, होल्डिंग पॉन्ड्स, स्मशानभूमी, रोज बाजार, अग्निशमन या सेवा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत चर्चा झाली. स्वामी नित्यानंद रस्त्याचे रूंदीकरण, शाळा हस्तांतरण, लसीकरण मोहीम, पालिका हद्दीतील अतिक्रमण, प्रस्तावित नवीन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रस्तावित वॉर्ड ऑफिस बांधकाम या विषयांचा आयुक्तांनी आढावा घेतला.  असंघटित कामगारांची विकास आयुक्तांकडून सिटीझन सर्व्हिस  सेंटरच्या माध्यमातून नोंदणी केली जाणार आहे. यासाठी शासनाने ई-श्रम पोर्टल सुरू केले आहे. पालिकेने असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मदत करावी या उद्देशाने सिटीझन सर्व्हिस सेंटरचे कोऑर्डिनेटर प्रदीप पवार यांनी या विषयाची माहिती उपस्थित विभागप्रमुखांना दिली. पनवेल महापालिका क्षेत्रातील कर्मचारी निधी, भविष्यनिर्वाह निधी, आयकर न भरणारे, 16 ते 59 वयोगटातील कामगार यामध्ये नोंदणी करू शकतात. रायगडातील लघुउद्योग, गृहोद्योग, मच्छीमार, वीटभट्टी कामगार, रिक्षाचालक, फेरीवाले, टेम्पो ड्रायव्हर या अंतर्गत नोंदणी करू शकतात. नोंदणी करण्यासाठी कामगाराचे आधार कार्ड व बँकेचे पासबुक असणे आवश्यक आहे, अशी माहिती पवार यांनी दिली. असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी सेंटरला प्रभाग अधिकार्‍यांनी मदत करण्याचे आदेश बैठकीत आयुक्तांनी दिले.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply