मुरूड : प्रतिनिधी
सणासुदीच्या काळातही ग्रामीण व शहरी भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मुरूड तालुक्यात तर किमान सहा तासांपेक्षा जास्त वेळ वीज नसल्याने व्यावसायिकांना आपला व्यवसाय करणे जिकिरीचे ठरत आहे. गणेशोत्सव तोंडावर आला असताना मूर्तिकारांचे काम हातघाईवर आले आहे, मात्र त्यांनाही विजेचे विघ्न त्रासदायक ठरत असल्याचे चित्र आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे अनेक दिवस वीज नव्हती. त्यानंतर परिस्थिती सुरळीत होऊनसुद्धा वीज वारंवार जाण्याचे दृष्टचक्र संपत नसल्याने लोक त्रस्त झाले असून, ते महावितरण कंपनीविरोधात संताप व्यक्त करीत आहेत.
विजेअभावी व्यापारी, दुकानदार, झेरॉक्सवाले, डेअरीचालक, सायबर कॅफेचालक, कोल्ड्रिंक व्यवसाय करणार्यांना फटका बसत आहे. कामानिमित्त वीज घालवली तर हरकत नाही, पण ती लवकरात लवकर यावी अशी अनेकांची अपेक्षा असते, परंतु महावितरण कंपनीकडून सकाळी वीज गायब होते, ती थेट सायंकाळी सहा किंवा सात वाजता येत असल्याने दिवसा व्यवसाय करणार्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. शिवाय विजेच्या लपंडावामुळे घरातील विद्युत दिवे व इतर उपकरणे नादुरुस्त होण्याचे प्रकारसुद्धा घडत आहेत.
गणेश मूर्तिकारांना जनरेटरचा आधार
गणेशोत्सव जवळ आला असल्याने बाप्पाची मूर्ती घडविणारे कारागीर सध्या रंगकामात गुंतले आहेत. त्यांना स्प्रेद्वारे रंगकाम करताना विजेविना समस्या निर्माण होत आहे. वीज नसल्याने जनरेटर भाड्याने आणून या कारखानदारांना पैसे खर्च करावे लागत आहेत. महावितरणने सण-उत्सवात तरी कारभार सुधारावा, अशी मागणी आता होत आहे.