Breaking News

पार्थ अपरिपक्व, त्याच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही -शरद पवार

मुंबई : प्रतिनिधी

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे युवा नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू पार्थ हा अपरिपक्व असून, त्याच्या बोलण्याला मी कवडीचीही किंमत देत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची बैठक झाली. या बैठकीनंतर पवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. शरद पवार यांना यासंबंधी विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही. तो अपरिपक्व आहे.

एका अभिनेत्याने आत्महत्या केली हे दुर्दैवी आहे. हे व्हायला नको होते, पण ज्या पद्धतीने मीडियात चर्चा होत आहे त्याचे आश्चर्य वाटते. माझ्या जिल्ह्यात 20 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली, पण मीडियाने त्याची नोंदही घेतली नाही, अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली. सुशांतप्रकरणी तपास करण्यास महाराष्ट्र तसेच मुंबई पोलीस सक्षम आहेत. त्यांच्यावर मला 100 टक्के विश्वास आहे, पण तरीही सीबीआय किंवा इतर यंत्रणेने तपास करावा असे वाटत असेल तर मी त्याला विरोध करणार नाही. चौकशी कोणी करायची हा सरकार, सीबीआयचा प्रश्न आहे, असेही पवार म्हणाले.

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply