न्यूयॉर्क : वृत्तसंस्था
भारताच्या 74व्या
स्वातंत्र्यदिनी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरवर तिरंगा फडकणार आहे. विशेष म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारे राष्ट्रीय ध्वजाचा अनोखा सन्मान होणार आहे. अमेरिकेतील फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशनने (एफआयए) यासंदर्भातील माहिती दिली. 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर टाइम्स स्क्वेअरवर राम मंदिराचा फोटो झळकला होता.
अमेरिकेतील न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि कॉन्टेकट या तीन राज्यांमधील भारतीयांचा समावेश असणार्या एफआयएने जारी केलेल्या पत्रकामध्ये 15 ऑगस्ट 2020 रोजी टाइम्स स्क्वेअरवर तिरंगा फडकवून आम्ही इतिहास घडविणार आहोत, असे म्हटले आहे. दरवर्षी एफआयएकडून स्वातंत्र्यदिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यानिमित्त छोटी परेडही होते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परेड रद्द करण्यात आली आहे, पण तिरंगा फडकविला जाणार आहे. न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाचे रणधीर जैसवाल हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.