पाली : प्रतिनिधी
ऐन उन्हाळ्यातच लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे एका बाजूला निवडणूक प्रचाराचे तापलेले रण तर दुसर्या बाजूला उन्हाच्या तीव्र झळा यामुळे उमेदवारांसह कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. लोकसभेचा भलामोठा मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी निघालेल्या उमदेवार व कार्यकर्त्यांना भर उन्हात मतदारांशी संवाद साधणे कठिण होऊन बसले आहे. उन्हाच्या तिव्रतेने निवडणूक प्रचार प्रसारप्रक्रीयेत अडचणी येत असल्याचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.
मार्च, एप्रिल आणि मे हे महिने कडक उन्हाळ्याचे असतात. याच काळात लोकसभेची सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरु आहे. सध्या उन्हाची काहिली वाढल्याने कार्यकर्त्यांना सभा व बैठकीला माणसे गोळा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तापमानात वाढ झाल्याने कार्यकर्त्यांना उन्हाचा त्रास होत असला तरी आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी कार्यकर्ते तहान, भूक व उन्हाची पर्वा न करता प्रचंड मेहनत घेताना दिसत आहेत. उमेदवार आपल्या प्रचाराच्या सभा सूूर्य मावळल्यानंतर सायंकाळी ठेवणे पसंत करीत आहेत. उन्हाच्या काहिलीने घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे प्रचार व प्रसाराकरिता सायंकाळ व रात्रीची वेळच उमेदवारांना सोईची ठरत आहे.
प्रचाराकरिता मिळालेल्या कमी कालावधीमध्ये संपूर्ण मतदारसंघात पोहचणे म्हणजे उमेदवारांसह कार्यकर्त्यांसमोर मोठे आव्हानच निर्माण झाले आहे. मात्र भर उन्हातही पक्षनिष्ठा व नेत्यावरील प्रेम यामुळे तापत्या उन्हातही हमारा नेता कैसा हो… जैसा हो… असा सूर कार्यकर्त्यांकडून आळवला जात आहे.
मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी द्या -जिल्हाधिकारी
अलिबाग : जिमाका
रायगड आणि मावळ मतदारसंघात अनुक्रमे 23 आणि 29 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान असून या दिवशी येथील मतदारांना भरपगारी सुट्टी किंवा दोन तासांची सवलत देण्याचे निर्देश उद्योग, ऊर्जा कामगार विभागाने दिले आहेत. त्याची काटेकोर अंमलबजावणी सर्व आस्थापनांनी करावी, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी निर्देश दिले आहेत.
मतदारांना त्यांचा हक्क बजावता येणे गरजेचे आहे, मात्र काही अस्थापना, उद्योग-व्यवसाय त्यांच्या कर्मचार्यांना सुट्टी किंवा सवलत देत नाहीत, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी त्या मतदारसंघाबाहेर कार्यरत असलेल्या येथील मतदारांना भरपगारी सुट्टी द्यावी किंवा अपवादात्मक परिस्थितीत दोन ते तीन तासांची सवलत देण्यात यावी, असे परिपत्रकात म्हटले आहे.
मात्र सवलत देण्यापूर्वी जिल्हाधिकारी अथवा मनपा आयुक्त यांची मान्यता घ्यावी लागेल. याबाबतीत एखाद्या आस्थापनेविरुद्ध तक्रार आल्यास कारवाई केली जाणार आहे.
रायगडात एक हजार 330 सर्व्हिस वोटर्स
पेण : प्रतिनिधी
लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलीस दलातील जवान तसेच प्रशिक्षणासाठी किंवा शासकीय सेवेनिमित्त प्रतिनियुक्तीवर परदेशात असलेल्या भारतीय अधिकारी, कर्मचार्यांसाठी भारत निवडणूक आयोगाने यंदाच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम (ईटीपीबीएस) उपलब्ध करून दिली आहे. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार 330 सर्व्हिस वोटर्सची नोंद झाली असून, त्यांच्यापर्यंत इलेक्टॉनिकरित्या मतपत्रिका पोहोचवल्या जाणार आहेत.