Breaking News

कशेडी घाटात चालत्या बसमधून चोरी; संशयित अटकेत

पोलादपूर : प्रतिनिधी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून जाणार्‍या एका चालत्या लक्झरी बसमधून प्रवाशांचा ऐवज चोरल्याची घटना गुरुवारी (दि. 13) पहाटे अडीचच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलादपूर पोलिसांनी धामणदिवी ग्रामस्थांच्या मदतीने रातोरात कोम्बिंग ऑपरेशन करून एका संशयित आरोपीला पकडले. या गुन्ह्यामध्ये अजून पाच आरोपी सामिल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
पिंपळेश्वर ट्रॅव्हल्सची मुंबई-गुहागर लक्झरी बस (एमएच 9473) कशेडी घाटातून खड्ड्यांच्या महामार्गावरून मंद गतीने पुढे चालली होती. धामणदिवी गावाजवळील वळणावर बसमधील प्रवाशाला एक व्यक्ती डाव्या बाजूच्या डिकीतील प्रवाशांचे सामान काढून रस्त्यावर टाकत असून दुसरी व्यक्ती ते उचलून नेत असल्याचे दिसले. या प्रवाशाने चालकाला ही घटना सांगून बस थांबायला लावली असता, मागील वाहनांतून आलेल्या व्यक्ती रस्त्यावरील सामान गोळा करून पसार झाल्या.
पोलादपूर पोलिसांनी नाकाबंदी करून धामणदिवी ग्रामस्थांच्या मदतीने घाटातील जंगलभागात कोम्बिंग ऑपरेशन केले. तेव्हा एका झाडालगतच्या पाईपमध्ये एक व्यक्ती लपलेली आढळून आली. पोलिसांनी हटकले असता, त्याने तो तेथे उभ्या असलेल्या ट्रकचा ड्रायव्हर असल्याचे सांगितले. त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केल्यावर त्याने सोबत दोन वाहने व त्यात प्रत्येकी तीन जण असल्याची माहिती दिली.
या गुन्ह्यात आठ प्रवाशांचे सुमारे 24 हजार 500 रुपये किंमतीचे कपडे, चीजवस्तू, रोख रक्कम तसेच गणपतीच्या डेकोरेशनचे सामान असलेल्या बॅग चोरीस गेल्या आहेत. या प्रकरणी पोलादपूर पोलिसांनी आरोपी अशोक धर्मराज जाधव (45, उंबरा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) याला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केली आहे. तो फासेपारधी समाजातील असून, त्याचे फरारी साथीदार हरी शहाजी शिंदे, अनिल लालासाहेब शिंदे, उत्तम सुंदर शिंदे, दत्तात्रेय लालासाहेब शिंदे, संतोष पवार हेही फासेपारधी असल्याचे समजते. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply