Breaking News

राज्यातील मंत्र्यांची बदल्यांमधून प्रचंड कमाई

सीआयडी चौकशीची चंद्रकांत पाटील यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी 15 टक्के बदल्यांच्या नावाखाली अनेक मलाईदार ठिकाणी मर्जीतील अधिकार्‍यांच्या बदल्या करून प्रचंड पैसा गोळा केला आहे, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे तसेच याची सीआयडीकडून चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थ खात्याने बदल्या करू नयेत, असा आदेश दिलेला असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सामान्य प्रशासन विभागाने बदल्यांवरील स्थगिती उठवली, हे आश्चर्यकारक आहे. राज्य सरकारने कोरोनामुळे बदल्या रोखल्या होत्या, पण नंतर 15 टक्के बदल्यांना परवानगी देऊन त्यावरील स्थगिती उठविली. परिणामी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी मलाईदार ठिकाणी बदली करून देण्याचा बाजार मांडला. यामध्ये फार मोठ्या रकमेची उलाढाल झाली. ज्यांचे राजकीय लागेबांधे नाहीत आणि ज्यांच्याकडे आर्थिक बळ नाही अशा अधिकारी व कर्मचार्‍यांवर यात अन्याय झाला आहे. या सर्व प्रकरणाची सीआयडीकडून चौकशी करण्याची गरज आहे.
राज्य सरकारच्या या धोरणातील गोंधळामुळे कोरोनाचे संकट असताना मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचार्‍यांना त्यांच्या कुटुंबाचे स्थलांतर करण्याची वेळ आली तसेच कोरोनाची साथ रोखण्याच्या प्रयत्नांमध्येही अडथळा आला, अशी टीका पाटील यांनी केली आहे.

Check Also

आमदार महेश बालदींच्या उपस्थितीत विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून व विकासात्मक धोरणावर …

Leave a Reply