- सर्व दुकाने दररोज उघडण्यास परवानगी
- आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीला यश
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका हद्दीतील दुकाने दररोज उघडण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणी व पाठपुराव्याला यश आले असून, शनिवार (दि. 15) म्हणजेच स्वातंत्र्य दिनापासून सर्व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे.
पनवेल महानगरपालिकेने ‘मिशन बिगीन अगेन’नुसार दुकानांना सम-विषम तारखेचा फॉर्म्युला लागू केला होता. दिवसाआड पद्धतीमुळे व्यवसाय होत नसल्याने व्यापारी आर्थिक विवंचनेत सापडले होते. या पार्श्वभूमीवर दुकानदारांना नियमित व्यवसाय करण्यास मुभा देण्याची लेखी मागणी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. त्याचबरोबर आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. समन्वय बैठकीतही या मुद्द्यावर जोर देऊन पाठपुरावा केला गेला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीला आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, शनिवारपासून सर्व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसे आदेश मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शुक्रवारी जारी केले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेमार्फत 3 जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन जाहीर झाला. टाळेबंदीमुळे दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे उद्योजक व व्यापार्यांना फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले. 1 ऑगस्टपासून लॉकडाऊनचे नियम जाहीर करताना छोट्या-मोठ्या व्यापार्यांची दुकाने सम-विषम तारखेप्रमाणे सुरू होती, परंतु पनवेलमधील डी-मार्ट तसेच सुपर व मिनी मार्केटमधील व्यवहार लॉकडाऊनच्या नियमाचा भंग करून दररोज सुरळीतपणे सुरू होते. ज्याप्रमाणे डी-मार्ट व सुपर मिनी मार्केट सुरू आहेत त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून महापालिका हद्दीतील छोट्या-मोठ्या उद्योगधंद्यांनादेखील दररोज व्यवहार करण्याची परवानगी मिळावी अशी संपूर्ण पनवेल महापालिका क्षेत्रातील व्यापार्यांनी मागणी आहे. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घ्यावी. मागणी अमान्य केल्यास व्यापार्यांनी आंदोलनाचे पाऊल उचलण्याचे ठरवले असल्याचेही निवेदनात नमूद करून व्यावसायिक व व्यापार्यांची मागणी ही रास्त असल्याने भाजपकडून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात येईल, असा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला होता. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीतही या मुद्द्यावर त्यांनी भर दिला होता.
पुणे महापालिकेने दिलेल्या गाइडलाइन्सचा अभ्यास करून याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले होते. त्यानुसार शनिवारपासून दोन्ही बाजूंची दुकाने नियमित सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे, मात्र त्यासाठी गर्दी टाळणे तसेच सामाजिक अंतर पाळणे यांसारखे नियम व अटी घालून देण्यात आल्या आहेत. दुकानदारांनी त्याचे पालन करणे अनिवार्य आहे. अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे तसेच कंटेन्मेंट झोनमध्ये पूर्वीप्रमाणेच नियमावली असणार असल्याचे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी उद्योजक व व्यापारांच्या व्यथा मांडून हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.