आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ
पनवेल : वार्ताहर
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने वृक्ष संवर्धन साक्षरता दिनाचे आयोजन करण्यात आले होते. इंडियन ऑइल आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमान झालेल्या या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते माझे झाड उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी आमदार विक्रांत पाटीलही उपस्थित होते.
वृक्ष पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्तुत्य उपक्रम हाती घेतल्याबद्दल आयोजकांचे कौतुक करून वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असल्याचे सांगितले. आज सुरू केलेल्या अभियानाच्या अनुषंगाने पुढील 10 वर्षानंतर रूजलेल्या आणि वाढलेल्या झाडांच्या सानिध्यात आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा भेटूयात अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी पत्रकार विकास मंचला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आमदार विक्रांत पाटील यांनी वृक्ष संवर्धनाचे महत्त्व सांगून उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. पत्रकार विकास मंचचे अध्यक्ष मंदार दोंदे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या नियोजनाची संकल्पना उपस्थितांसमोर मांडली.
या उपक्रमांतर्गत पनवेल महापालिका हद्दीत 100 बहुवार्षिक झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. पनवेल महापालिका उद्यान विभागाच्या समन्वयाने या वृक्षांचे संवर्धन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापालिकेचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते, इंडियन ऑईलचे पश्चिम विभाग एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पी. त्रिपाठी, जनरल मॅनेजर रत्नशेकर भट्टाचार, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले, पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, इंडियन ऑईलचे अभिषेक कुमार, अनिल नागवेकर, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, पमपा उद्यान विभागाच्या वतीने सिद्धार्थ कांबळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार मंचचे सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, विवेक पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, खजिनदार संजय कदम, सरचिटणीस हरेश साठे, प्रवीण मोहोकर, नितीन कोळी, राजू गाडे यांनी परिश्रम घेतले.
वृक्षारोपण मोहीमेत सर्व सहभागी होतात मात्र वृक्ष संवर्धनात एक पाऊल मागे जाते, झाडे लावण्याइतकीच महत्त्वाची जबाबदारी म्हणजे त्यांचे संगोपन व संवर्धन करणे. या पार्श्वभूमीवर माझे झाड ही अभिनव संकल्पना राबवण्यात आली आहे. या संकल्पनेच्या अनुषंगाने प्रत्येक नागरिकाने फक्त झाड लावण्यापलीकडे जाऊन ते झाड आपलेच समजून त्याची जबाबदारी स्वीकारावी. महाराष्ट्रभूषण तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पनवेल तालुक्यातील पाले बुद्रुक येथे जवळपास पाच हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले असून श्री सदस्य त्या ठिकाणी नियमित जाऊन त्या झाडांचे संवर्धन करत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी एक प्रकारची जीवसृष्टी परत आली असून पनवेलला त्या रूपाने वैभव मिळाले आहे.
-आमदार प्रशांत ठाकूर
RamPrahar – The Panvel Daily Paper