महिनाभरात 10 हजार रुग्णांची वाढ
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पदभार स्वीकारून एक महिना पूर्ण झाला. तीस दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट वाढली आहे. तब्बल दहा हजार रुग्ण वाढले आहेत. ब्रेक द चेन मोहिमेला फारसे यश लाभलेले नाही. मृत्युदर शून्यावर आणण्याची घोषणा केली असून आतापर्यंत अर्धा टक्का कमी करण्यात यश आले आहेत.
नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पाच हजार झाल्यानंतर तत्कालीन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.
दोनच दिवसांत बदली रद्द करण्यात आली. पुढील 22 दिवसांत रुग्णसंख्या दहा हजारांवर पोहचली. 14 जुलैला पुन्हा आयुक्तांची बदली करण्यात आली. अभिजीत बांगर यांनी मनपा आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. पहिल्याच पत्रकार परिषदेत कोरोनाची साखळी खंडित करण्याची व मृत्युदर शून्यावर आणण्याची घोषणा झाली.
आयुक्तांनी मिशन ब्रेक द चेन, मृत्युदर शून्यावर आणण्यासाठी विशेष मोहीम, झीरो नवी मुंबई मिशन हातात घेतले. चाचण्यांची संख्या वाढविली. एक महिन्यात चाचण्यांची संख्या तीनपट वाढविली आहे. एक महिन्यापूर्वी 27,249 जणांच्या चाचण्या झाल्या होत्या. एका महिन्यात हा आकडा 85 हजारांपेक्षा जास्त झाला आहे, परंतु या एक महिन्यात ही कोरोनाची साखळी खंडित झालेली नाही. रुग्णसंख्या दहा हजारांवरून वीस हजारांपेक्षा जास्त झाली आहे.
महानगरपालिकेच्या वाशी रुग्णालयातील मृत्युदर चिंताजनक आहे. या एक महिन्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 60 वरून 80 वर पोहचला, हिच सर्वाधिक दिलासा देणारी गोष्ट आहे. नवी मुंबईमध्ये एका महिन्यापूर्वी कोरोना चाचणीसाठी खूप वेळ लागत होता. 5 ते 10 दिवस रिपोर्टची वाट पाहावी लागत होती. यामुळे उपचार करण्यास विलंब होऊन काही रुग्णांचा मृत्यू होत होता. महानगरपालिकेने स्वत:ची लॅब सुरू केल्यामुळे व अँटिजेन चाचण्या वाढविल्यामुळे चाचणीसाठी लागणारा विलंब टळला आहे. अहवाल लवकर मिळत असल्याने उपचारही लवकर सुरू करता येत आहेत. चाचण्यांची संख्या एका महिन्यात 27 हजारांवरून 85 हजारांवर पोहोचली आहे.
क्वारंटाइन रुग्ण तीन लाखांवर
कोरोना रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या संपर्कातील किमान 20 व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. आवश्यक त्यांना क्वारंटाइन केले जात होते. 14 ऑगस्टपर्यंत दोन लाख 33 हजार 752 जणांचे क्वारंटाइन पूर्ण झाले असून, जवळपास 68 हजार जणांचे होम क्वारंटाइन सुरू आहे.