Breaking News

प्लाझ्मा दान करणार्यांचा गौरव करावा

आमदार गणेश नाईक यांची मागणी

नवी मुंबई ः बातमीदार

अनेक कोरोनाबधित रुग्ण बरे झाल्यानंतर प्लाझ्मा दान करण्यासठी पुढे सरसावले आहेत. नवी मुंबईच्या दृष्टीने ही चांगली बाब असून, पालिकेने अशा प्लाझ्मा दान करणार्‍यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करावा. त्यामुळे इतरांनाही प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने आमदार गणेश नाईक आयुक्तांची भेट घेत आहेत. त्या अनुषंगाने कोविड उपाययोजनांसंदर्भात आमदार गणेश नाईक यांनी मंगळवारी (दि. 18) पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली.

मनपाने दोन आठवड्यांपूर्वी डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाशी महत्त्वपूर्ण करार केला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात नवी मुंबईकरांसाठी 20 व्हेंटिलेटर बेड्ससह 50 ऑक्सिजनसमृद्ध बेड्स प्राप्त झाले आहेत. यामुळे नवी मुंबईच्या आरोग्याशी संबंधित बर्‍याच प्रश्नांना दिलासा मिळाला आहे, असेही आमदार गणेश नाईक यांनी सांगितले. कोरोना संक्रमित रुग्ण इतर रोगांनी ग्रस्त असल्यास  उपचारासाठी होणार्‍या विलंबामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो. अशा रुग्णांसाठी डॉ. डी. वाय. पाटील  रुग्णालयात ऑपरेशनची त्वरित सुविधा उपलब्ध करून द्यावी. इंजेक्शनचा काळाबाजार रोखला जावा, अशा सूचनाही आयुक्तांना केल्याचे आमदार गणेश नाईक यांनी सांगितले.

याशिवाय रुग्ण बरे होत आहेत ही समाधानाची बाब असली तरी सर्वकाही सुरळीत होताना नियमांत कठोरता कायम राहावी. नागरिकांनी साथ दिली तर ऑक्टोबरपर्यंत नवी मुंबई कोरोनामुक्त होईल, असा विश्वासही आमदार गणेश नाईक यांनी या वेळी व्यक्त केला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply